

Five and a half thousand farmers registered to purchase soybeans from NAFED
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात नाफेडच्यावतीने १३ केंद्रांतून सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबरपासून काही केंद्रात खरेदीस सुरुवात होणार असून त्यासाठी जिल्ह्यातील ५ हजार ५६३ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
जालना जिल्ह्यात नाफेडच्यावतीने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात न आल्याने सुरुवातील ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विटलने बाजारात सोयाबीन खरेदी करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला. शेतकऱ्याची अर्धी सोयाबीन व्यापाऱ्यांन विकत घेतल्यानंतर वराती मागून घोडे या म्हणीप्रमाणे नाफेडच्यावतीने सोयाबीन खरेदीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.
नाफेडच्या वतीने ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विटल या शासकीय हमी भावाने सोयाबीन खरेदी होणार असल्याने नाफेडची सोयाबीन खरेदी सुरू होताच बाजारातील सोयाबीनचे भावही तेजीत राहणार आहे. नाफेडच्यावतीने दरवर्षी उशिराने सोयाबीन खरेदी करण्यात येत असल्याने छोट्या शेतकऱ्यांकडे आर्थिक ताकद व सोयाबीन साठविण्याची सोय नसल्याने ते बाजारात मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करतात.
त्यामुळे त्यांना हमी भावापेक्षा कमी भावाने सोयाबीन विक्री करावी लागत असल्याने नुकसानीला तोंड द्यावे लागते. शासनाचा सोयाबीनचा हमी भाव ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल असताना बाजारात त्यापेक्षा खूपच कमी भावाने सोयाबीनची विक्री झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यातील ५ हजार ५६३ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यात अंबड ९०, मंठा १६५१, राजूर ५९७, बदनापूर २०४, वाटूर मापेगाव ९४३, परतूर १४९९, रामनगर ५७९ शेतकऱ्यांचा समावेश आहे.