Sambhajinagar News : कॉलेजमधील भांडण सोडवल्याचा राग; विधीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याचा चाकूने प्राणघातक हल्ला file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : कॉलेजमधील भांडण सोडवल्याचा राग; विधीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याचा चाकूने प्राणघातक हल्ला

एन-६ सिडकोत भररस्त्यात थरार; मध्यस्थी करणाऱ्या मित्रावरही वार, चौघांविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Anger at resolving a college feud; Vidhi student attacked by gang with knife

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: कॉलेजमधील जुन्या भांडणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून, एलएलबीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका २२ वर्षीय विद्यार्थ्यावर भरदिवसा रस्त्यात बुलेट आडवी लावून धारदार चाकूने पोटात भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. विद्यार्थ्याने वार हातावर झेलल्याने त्याचा जीव वाचला. मात्र त्याला वाचवण्यासाठी आलेल्या मित्रालाही सोन्या, इसको भी डाल दे असे म्हणत चाकूने वार करून रक्तबंबाळ केले. हा थरार शनिवारी (दि. १७) दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास एन-६ सिडको परिसरातील सैलानी बाबा व्हील अलायन्मेंटसमोर घडला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात चौघा गुंडांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्ष राठोड (रा. बंबाटनगर), स्वप्निल राठोड, संकेत राठोड आणि सोन्या अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी प्रीतमसिंग देविचंद बारवाल (२२, रा. हसूल) याच्या तक्रारीनुसार, तो एमजीएम कॉलेजमध्ये एलएलबीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याचा मित्र सौरभ पाटील याचे १३ ऑक्टोबर रोजी कॉलेज परिसरात फिरणाऱ्या हर्ष राठोड आणि स्वप्निल राठोड यांच्यासोबत कडाक्याचे भांडण झाले होते.

त्यावेळी प्रीतमने मध्यस्थी करून सौरभच्या बाजूने ते भांडण सोडवले होते. याचाच राग आरोपींच्या मनात होता शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास प्रीतम हा त्याचा मित्र दिग्विजय मराठे याच्यासह दुचाकीने जेएनईसी गेट क्रमांक ५ कडून टीव्ही सेंटर, एन-८ सिडकोकडे जात होता. दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास ते एन-६ सिडको येथील सैलानीबाबा व्हील अलायन्मेंटसमोर आले असता, आरोपींनी त्यांचा पाठलाग करून गाठले.

हर्ष राठोड, स्वप्निल राठोड आणि संकेत राठोड हे तिघे बुलेटवरून (एमएच-२०-एफए-८८७७) आले, तर त्यांचा साथीदार सोन्या हा विनानंबरच्या मोपेडवरून आला. हर्षने प्रीतमच्या दुचाकीसमोर बुलेट आडवी लावून त्यांना अडवले.

काही समजण्याच्या आतच हर्षने कमरेचा धारदार चाकू काढून, तुला भांडणामध्ये मधी-मधी यायची सवय आहे का? असे म्हणत थेट पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. प्रीतमने प्रसंगावधान राखून हा वार उजव्या हाताने अडवला, ज्यामुळे त्याच्या हाताची बोटे गंभीररीत्या कापली जाऊन तो रक्तबंबाळ झाला.

सोन्या, इसको भी डाल दे; मित्रावरही वार

रक्ताच्या धारा लागल्याचे पाहून मागे बसलेला मित्र दिग्विजय मराठे हा प्रीतमच्या मदतीसाठी धावून आला. त्यावेळी स्वप्निल आणि संकेत या दोघांनी दिग्विजयला दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेवले. हर्षने मोपेडवरील साथीदाराला सोन्या, इसको भी डाल दे अशी चिथावणी देताच, सोन्याने चाकूने दिग्विजयच्या डाव्या मांडीवर आणि उजव्या हाताच्या कोपऱ्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. दुपार दुपारच्या वेळी सुरू असलेला हा आरडाओरड ऐकून आजूबाजूचे नागरिक धावून येऊ लागल्याने चौघेही हल्लेखोर आझाद चौकाच्या दिशेने दुचाकींवरून पसार झाले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वाघ करत आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT