Chhatrapati Sambhajinagar Hospitals pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Hospitals : शहरातील रुग्णालयांची अग्निसुरक्षा वाऱ्यावर

मिनीघाटीत पाण्याचा ठणठणाट, ३५० पैकी किती रुग्णालयांना एनओसी अग्निशमन विभाग अनभिज्ञ

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : अमरावतीच्या जिल्हा महिला रुग्णालयातील एनआयसीयू कक्षात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. सहा बालकांना अन्य रुग्णालयांत हलवावे लागले. या घटनेने रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांच्या फायर एनओसीची स्थितीही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

एकीकडे रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अग्निसुरक्षेची वैधता अद्ययावत नसणे ही बाब गंभीर मानली जात आहे. तर दुसरीकडे, शहरातील साडेतीनशेहून अधिक खासगी रुग्णालयांच्या फायर एनओसी आणि अग्निसुरक्षा यंत्रणेची अद्ययावत माहितीच महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे उपलब्ध नसल्याचे सोमवारी (दि. २४) समोर आले आहे.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारण्यात आलेली असली तरी अनेक ठिकाणी तिचे नूतनीकरण आणि देखभाल झालेली नाही. विशेष म्हणजे मिनीघाटी रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र या यंत्रणेला पाणीपुरवठा करणाऱ्या हौदातच पाणी नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी यंत्रणा किती परिणामकारक ठरेल, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, सुमारे सहा महिन्यांपूर्वी गजानन महाराज रोडवरील एका रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर एसीला आग लागली होती.

त्यावेळी रुग्णांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. अशा घटनांनंतरही रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील किती रुग्णालयांनी एनओसी घेतली आहे. याची अद्ययावत नोंद विभागाकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रुग्णालयांसारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी अग्निसुरक्षेची स्थिती स्पष्ट नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

साडेतीनशे रुग्णालयांचा प्रश्न

शहरात सुमारे ३५० खासगी रुग्णालये आहेत. ५० पेक्षा कमी खाटांच्या रुग्णालयांसाठी अग्निशामक उपकरणे ठेवणे, तर ५० पेक्षा अधिक खाटांच्या रुग्णालयांसाठी स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात अनेक रुग्णालयांनी उपकरणे बसविली असली तरी त्यांची वैधता आणि कार्यक्षमता तपासली जात नसल्याचे चित्र आहे. तसेच मुदत संपलेली अग्निशामके केवळ भिंतीवर टांगून ठेवण्यात आल्याचेही आढळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT