Amidst the crowd celebrating the election results, jewellery worth 10 lakhs was stolen, and one thief was caught red-handed
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीच्या निकालासाठी गरवारे स्टेडियमबाहेर जमलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. शुक्रवारी (दि. १६) दुपारी घडलेल्या या घटनेत चोरट्यांनी चार जणांच्या गळ्यातील ५७ ग्रॅमच्या सोन्याच्या साखळ्या आणि रोख रक्कम असा एकूण ९ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
नागरिकांनी एका चोरट्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सुभाष लक्ष्मण गुंजाळ (२०, रा. पेठ बीड पोलिस ठाण्यामागे, बीड) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार पसार झाला आहे. सुभाषला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी शनिवारी (दि.१७) दिली.
फिर्यादी प्रशांत बाबूलाल जैस्वाल (२६, रा. सातारा परिसर) हे खासगी नोकरी करतात. शुक्रवारी दुपारी ते निवडणूक निकाल पाहण्यासाठी गरवारे स्टेडियमवर गेले होते. दुपारी ३:३० च्या सुमारास निकाल ऐकून बाहेर पडत असताना, गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात इसमाने त्यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम सोन्याची साखळी तोडली. प्रशांत यांनी प्रसंगावधान राखत साखळी चोरणाऱ्या सुभाष गुंजाळला जागीच पकडले. मात्र, त्या चोरट्याने हातातील साखळी गर्दीतील आपल्या दुसऱ्या साथीदाराकडे दिली आणि तो साथीदार ती घेऊन पळून गेला.
सुभाषच्या अंगझडतीत खिशात दुसऱ्या एका साखळीचा तुटलेला तुकडा आढळून आला. त्याला पकडून प्रशांत जैस्वाल यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात आणले. अभियांत्रिकीसमोरही ३ तोळ्यांची चेन चोरणारा पकडला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर मनपा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी गेलेल्या सिव्हिल इंजिनिअरच्या गळ्यातील ३ तोळ्यांची सोनसाखळी चोरणाऱ्याला नागरिकांनी पकडले. ही घटना शुक्रवारी (दि.२६) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
अमोल नामदेव धोत्रे (३३, रा. इंदिरानगर, पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे अटकेतील आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संग्राम ताठे यांनी दिली. त्याचठिकाणी अन्य एका तरुणाचीही सोनसाखळी चोरल्याचा प्रकार घडला होता. मात्र, त्याला ती मिळून आल्याने त्याने तक्रार दिली नाही. दरम्यान, धोत्रेकडे मुद्देमाल मिळून आ-लेला नाही, त्याचा अन्य कोणी साथीदार असण्याची शक्यता आहे. न्यायालयाने धोत्रेची हसूल जेलमध्ये रवानगी केली.
तिघांच्याही सोनसाखळ्या लंपास
पोलिस ठाण्यात गेल्यावर लक्षात आले की, केवळ प्रशांतच नव्हे, तर इतर तिघांनाही या टोळीने लुटले आहे. नरेंद्र आसाराम आव्हाड यांची ३० ग्रॅमची सोन्या चेन, सात्विक श्रीराम टेपाळे २७ ग्रॅम सोन्याची चेन व रोख १५ हजार आणि शुभम जनार्दन गोंडे यांची ३० ग्रॅम सोन्याची साखळी चोरट्याने लंपास केल्याचे समोर आले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात सुभाष गुंजाळ आणि त्याच्या फरार साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार तांबोरे करत आहेत.