

A pedestrian was run over by a speeding tractor in Waluj
वाळूज, पुढारी वृत्तसेवा : ऊस वाहतूक डबल ट्रॉलीच्या करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरने रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यास चिरडले. ही घटना रविवारी (दि.१८) सकाळी ११ वाजता वाळूज येथे घडली. शिवनाथ एकनाथ पवार (५१, रा. कान्हेवाडी, ता. गंगापूर) असे मृताचे नाव आहे.
याविषयी माहिती अशी की, शिवनाथ पवार हा छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरून पायी जात असताना मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टर (एमएच २० एफपी २१९६) ने जोराची धडक दिली. यावेळी ट्रॉलीचे मागील चाक शिवनाथच्या डोक्यावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते. दरम्यान ट्रॅक्टर चालक हा अपघातस्थळी न थांबता तसाच पुढे निघून गेल्यानंतर नागरिकांनी त्यास अडविले.
त्यानंतर पोलिसांनी ते ताब्यात घेतले. यावेळी अंमलदार सचिन राजपूत, स्वप्नील खाकरे, मल्हारराव गरगडे, जोनवाल यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी पवार यांना रुग्णवाहिकेव्दारे घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चालकाचे नाव मात्र कळू शकले नाही. पोलिसांनी नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
आनखी किती बळी गेल्यावर पोलिस कारवाई करणार ज्या ठिकाणी अपघाताची घटना घडली ते ठिकाण पोलिस ठाण्यालगतच असून, या अंतरावर सकाळ- संध्याकाळ वाहनांची नेहमीच गर्दी असते. या गर्दीतून रोड ओलांडताना नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. या ठिकाणी वाहतूक पोलिस असावेत, अशी अनेकांची मागणी आहे.
मात्र याकडे सबंधितांकडून दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे पोलिस ठाण्यासमोरच पोलिसांच्या नाकावर टिचून रस्त्यावर आडवी तिडवी वाहने उभी असतात. तरीही पोलिस याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करतात. आनखी किती बळी गेल्यावर कारवाईचा सोपस्कार करणार, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.