Along with wheat and rice, jowar is also available at ration shops.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त सेवा : सार्वजनिक वितरण प्रणा लीद्वारे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थीना दरमहा गहू आणि तांदळाचे वितरण केले जाते. मात्र या महिन्यात जिल्ह्यातील रेशन दुकानांवर गव्हासोबतच ज्वारीचाही पुरवठा करण्यात आला आहे. गहू आणि तांदूळ सर्व रेशन दुकानांवर पोहोचले आहेत. परंतु तांदळाचा साठा मात्र निम्म्याच दुकानांवर पोहोचला आहे. परिणामी, रेशन दुकानांवरून लाभार्थ्यांना माल वाटप करण्यास उशीर होत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रेशनचे एकूण ५ लाख ३८ हजार लाभार्थी आहेत. तर स्वस्त धान्य दुकानांची संख्या ही १८०२ इतकी आहे. या स्वस्त धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थीना दर महिन्याला धान्याचा मोफत पुरवठा होतो. यामध्ये प्रामुख्याने गहू आणि तांदूळ वितरित केले जातात. यावेळी स्वस्त धान्य दुकानांवर गव्हासोवत ज्वारी पुरविण्यात आली आहे. लाभार्थांना गव्हाबरोबरच ज्वारी दिली जाणार आहे.
सध्या शहरातील १९९ दुकानांना आणि ग्रामीण भागातील सोळाशे दुकानांना गहू आणि ज्वारीचा पुरवठा करण्यात आला आहे. तांदळाचा पुरवठाही सुरू आहे. परंतु आतापर्यंत निम्म्याचा रेशन दुकानांवर तांदूळ पोहोचला आहे. निम्म्या दुकानांवर तांदळाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे दुकानदारांकडून लाभार्थीना माल वितरणास विलंब होत आहे. शासनाकडून हमी भावाने धान्य खरेदी केली जाते. त्या अन्नधान्य साठ्याच्या उपलब्धतेचा आढावा घेऊन कधी कोणते धान्य द्यायचे हे ठरविले जाते. त्यानुसार या महिन्यात गव्हासोबत ज्वारी वाटपाचा निर्णय घेतला गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मार्जीन मनीचा निधी मिळाला
लाभार्थीना धान्य वितरण करण्याच्या कामापोटी रेशन दुकानदारांना प्रतिक्विटल १७० रुपये या प्रमाणे मार्जीन मनी दिला जातो. ऑक्टोबर महिन्याच्या धान्य वितरणापोटी रेशन दुकानदारांना द्यावयाच्या मार्जीन मनीचा निधी जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाला आहे. त्याचे लवकरच वितरण केले जाणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले.
लाभार्थीना वेळेत माल वितरण कठीण
शहरातील पन्नास टक्के रेशन दुकानांवरच तांदूळ पोहोचला आहे. उर्वरित तांदळाचा साठा पोहोचणे बाकी आहे. या महिन्यात गव्हाचा कोटा कमी करून त्याऐवजी ज्वारी दिली जात आहे. गहू आणि ज्वारी हे दोन्ही आले असले तरी तांदूळ न आल्यामुळे लाभार्थीना वितरण करण्यास अडचण येत आहे. शिवाय दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला स्वाईप मशीन बंद होते. त्यामुळे वेळेत माल आला तरच ३० तारखेच्या आत वाटप होऊ शकते. माल पुरवठ्यास उशीर झाल्यास लाभार्थीना धान्य वितरणास खूपच कमी वेळ मिळतो. त्यावेळेत धान्य वितरण न झाल्यास १ तारखेनंतर ते लाभार्थीना देता येत नाही, असे स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे राज्याध्यक्ष डी. एन. पाटील यांनी सांगितले.