Ajanta Caves News : अजिंठा लेणीतील तीन आक्रमक आग्या मोहळांचे यशस्वी स्थलांतरण File Photo
छत्रपती संभाजीनगर

Ajanta Caves News : अजिंठा लेणीतील तीन आक्रमक आग्या मोहळांचे यशस्वी स्थलांतरण

भारतीय पुरातत्त्व विभाग व वनविभागाच्या संयुक्त पथकाने ही मोठी कामगिरी पार पाडली.

पुढारी वृत्तसेवा

Ajanta Caves honey bee News

फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात गेल्या चार महिन्यांपासून पर्यटकांच्या जीवाला घोर ठरत असलेल्या आग्या मोहळांपैकी, लेणी क्र. १० जवळील सहापैकी तीन आक्रमक आग्या मोहळांचे यशस्वीपणे स्थलांतर करण्यात आले. भारतीय पुरातत्त्व विभाग व वनविभागाच्या संयुक्त पथकाला शुक्रवारी (दि. १३) सकाळी ही मोठी कामगिरी पार पाडता आली. सोलापूर व पुणे येथील श्र मधमाशी हल्ला बचाव तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी पाच वाजता ही कारवाई करण्यात आली.

अजिंठा लेणीत लेणी क्र. ४, ९, १० व २६ जवळ मिळून एकूण दहा आग्या मोहळांचे वास्तव्य होते. त्यामुळे मार्चपासून मधमाशांचे हल्ले सातत्याने होत होते. यामध्ये सर्वाधिक हल्ले लेणी क्र. १० जवळून झाले होते. ७ जून रोजी लेणी क्र. १० जवळील हल्ल्यात तब्बल २०० पर्यटक जखमी झाले होते.

यानंतर परिस्थितीची गंभीर दखल घेत भापूवी व वनविभागाच्या पथकाने संयुक्त पाहणी करून तातडीने मोहळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. ९ जून रोजी स्कॅफफोल्डिंग उभारणीला सुरुवात झाली, परंतु त्याचवेळी कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे प्राथमिक योजनांमध्ये बदल करत लेणी क्र. ९ जवळील मोहळ्याचे प्रथम स्थलांतर करण्यात आले.

त्यानंतर अधिक सावधगिरीने स्कॅफफोल्डिग उभारून १३ जून रोजी पहाटे लेणी क्र. १० जवळील तीन मोहळांचे यशस्वी स्थलांतरण करण्यात आले. उर्वरित तीन मोहळे तसेच लेणी क्र. ९ व २६ जवळील मोहळांचे स्थलांतर लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे भापूवी व वनविभागाने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT