छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमने पैसे घेऊन उमेदवार दिले, असा आरोप करीत अनेकांनी बंडखोरी केली होती. तर काहींनी पक्षविरोधी काम करण्याचा इशारा दिला होता. परंतु पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी व त्यांचे बंधू अकबरोद्दीन ओवैसी यांच्या दोन सभा आणि पदयात्रांनी मुस्लिमबहुल भागातील संपूर्ण वातावरणच बदलून टाकले. त्यांच्या जादूने एमआयएमला अनपेक्षित यश मिळाले असून, नगरसेवक संख्या २४ वरून ३३ वर गेली आहे.
नांदेडमध्ये करिश्मा दाखविल्यानंतर एमआयएमने २०१४ साली छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवेश केला. पहिली विधानसभा निवडणूक लढविली. त्यात मध्य मतदारसंघात मत विभाजनाचा लाभ मिळाल्याने इम्तियाज जलील विजयी झाले. त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला होता. त्यानंतर एमआयएमने २०१५ साली पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक लढविली. त्यात महापालिकेत तब्बल दोन दशकांपासून विरोधी बाकावर बसणारे व कधी काळी सत्तेत असलेल्या कॉंग्रेसला धोबीपछाड देत एमआयएमने विरोधी पक्षनेते पद ताब्यात घेतले.
महापालिकेतील दुसरा मोठा पक्ष म्हणून एमआयएम पुढे आला. एमआयएम एवढ्यावरच थांबले नसून, २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत माजी आमदार इम्तियाज जलील यांनी उडी घेतली. यातही मत विभाजनाचा लाभ मिळाल्याने जलील हे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे चार वेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. त्यानंतरच्या विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुकीत एमआयएमला पराभवाचाच सामना करावा लागला.
दरम्यान, यंदा महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमने जुन्या माजी नगरसेवकांपैकी १४ जणांना डच्चू देत नव्यांना संधी दिली. त्यामुळे अनेकांनी बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केल्याने एमआयएमला फटका बसेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु ओवैसी बंधूंच्या सभा आणि पदयात्रांनी चित्र बदलून टाकले. त्यामुळे २४ वरून नगरसेवक संख्या ३३ वर गेली आहे.
महापालिका निवडणुकीत आमचे २६ ते २८ उमेदवार निवडून येतील, अशी शक्यता होती. त्यानुसार तयारीही करण्यात आली होती. परंतु ३३ उमेदवार निवडून आले हे आमच्यासाठी अपनेक्षित यश आहे.इम्तियाज जलील, प्रदेशाध्यक्ष, एमआयएम