
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीतील मतमोजणी आज होणार आहे. महापालिकेत अनेक मोठ्या लढती बघायला मिळत असून पालकमंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा, मुलगा सिद्धांत, आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषीकेश, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आदींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
संभाजीनगरमधील लक्षवेधी लढती कोणत्या?
प्रभाग क्रमांक २९ मधून मंत्री शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत हे निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे भगवान गायकवाड हे रिंगणात आहेत. शिरसाट यांची मुलगी हर्षदा ही प्रभाग क्रमांक १८ मधून रिंगणात आहे. त्यांना भाजपच्या मयुरी बरथुने यांचे तगडे आव्हान आहे.
सेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव ऋषीकेश हे प्रभाग १५ मधून नशीब आजमावत असून त्यांच्या विरोधात भाजपचे मिथून व्यास आणि ठाकरे सेनेचे लक्ष्मीनारायण बाखरिया हे मैदानात आहेत. यासोबतच ठाकरे सेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे हे प्रभाग १५ अ मधून उभे असून त्यांच्या समोर भाजपचे बंटी चावरिया, शिवसेनेचे मिलाब चावरिया हे उभे आहेत.
प्रभाग क्रमांक २२ मधून निवडणूक रिंगणात असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना भाजपचे लक्ष्मीकांत थेटे आणि ठाकरे सेनेचे संतोष खेंडके यांचे तगडे आव्हान आहे. भाजपकडून निवडणूक लढवित असलेले ठाकरे सेनेचे माजी महानगरप्रमुख राजू वैद्य यांना प्रभाग २७ मध्ये शिवसेनेचे अमोल पाठे आणि ठाकरे सेनेचे संतोष पाटील यांचे आव्हान असणार आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील ११५ जागांसाठी तब्बल ८५९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून एकूण ११ लाख १७ हजार ४७७ मतदार होते.
महापालिकेच्या निवडणुका यावेळी प्रभाग पद्धतीने होत आहेत. प्रत्येक प्रभागातून चार सदस्य निवडले जाणार आहेत. यावेळी काही ठिकाणी सात, तर काही आठ वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने यावेळी राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत आहे.
त्यात यावेळी सर्वच पक्ष बहुतेक ठिकाणी स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीसाठी सर्व पाचही महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या निवडणुकीची मतमोजणी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी होणार असून, शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंतच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर
शेवटची निवडणूक : एप्रिल २०१५
एकूण मतदार संख्या : ११ लाख १८ हजार २८३
एकूण जागा : ११५
रिंगणातील उमेदवार : ८५९
महापालिकेवर सत्ता : शिवसेना-भाजप युती
विरोधी पक्ष : एमआयएम
पक्षीय बलाबल : शिवसेना (२९), भाजप (२२), एमआयएम (२५), काँग्रेस (१०).