छत्रपती संभाजीनगर : मनपा निवडणुकीत दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास अपात्र ठरण्याच्या भीतीने, एमआयएम नगरसेवक मेहराज खान याने चक्क आपल्या तिसऱ्या मुलाला सख्ख्या भावाचा मुलगा असल्याचे भासवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याबद्दल सिटी चौक पोलिसांनी नगरसेवकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून नगरसेवक आणि एका मुख्याध्यापकाला अटक केली आहे.
नगरसेवक मेहराज खान जलील खान, मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दीकी या दोघांसह निलोफर मेहराज खान, मिनाज खान जलील खान, इकरा मिनाज खान, सज्जू उस्ताद आणि विधिसंघर्षग्रस्त बालकाचा आरोपींमध्ये समावेश आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक मनिषा हिवराळे यांनी तक्रार दाखल केली आहे.
२७ मार्च रोजी इस्लाम पार्टीचे नेते रफत यार खान यांनी सिटी चौक ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यात मेहराजचा भाऊ मिनाज खानसह ११ आरोपींचा समावेश होता. यात एक विधिसंघर्षग्रस्त बालकही होता. गुन्ह्याच्या तपास अधिकारी मनिषा हिवराळे यांनी दोघांना अटक करून विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत हा प्रकार समोर आला आहे.
नगरसेवकाने तिसरे अपत्य लपवण्यासाठी बराच खटाटोप केल्याचे त्या विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या कागदपत्रांवरून समोर आले. याला संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनीही मदत केली. त्या बालकाचे शाळेत शिकत असल्याचे प्रमाणपत्र तसेच मुख्याध्यापक इलियास सिद्दीकीच्या लेखी जबाबात त्या विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या वडिलांचे नाव बदलून (मेहराज ऐवजी मिनाज) आरोपी सज्जू उस्ताद याने त्याचे जन्मप्रमाणपत्र पाठवल्याचे समोर आले. त्या प्रमाणपत्राची खात्री केली असता ते बनावट असल्याचे उघड झाले.
दोघांना अटक
पोलिस तपासात मेहराज खानने तिसरे अपत्य लपवल्याचे उघड होताच वरिष्ठांच्या आदेशाने १२ मे रोजी सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लगेचच आरोपी मेहराज खान आणि मुख्याध्यापक इलियास सिद्दीकी या दोघांना अटक करून वैद्यकीय तपासणी केली. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे करीत आहेत.