Raigad news | ग्रामपंचायतीतील लोकसेवकांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; अँटी करप्शनची धाडसी कारवाई

म्हसळा तालुक्यात भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर
Bribery case
Bribery casePudhari Photo
Published on
Updated on

श्रीकांत बिरवाडकर

म्हसळा : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली. यामध्ये दोन अधिकाऱ्यांना ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. यामुळे लाचखोरीला मोठी चाप बसला आहे. तसेच या कारवाईमुळे ग्रामपंचायत स्तर व पंचायत समिती विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हसळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खारगाव खुर्द येथील दोन लोकसेवकांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) रायगड अलिबाग पथकाने रंगेहात पकडल्याची घटना घडली असून या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी बबन लक्ष्मण कांबळे,वय ४४ वर्ष, कृषी अधिकारी,पंचायत समिती म्हसळा व अतिरिक्त कार्यभार प्रशासक ग्रुप ग्रामपंचायत खारगाव खुर्द वर्ग-२ तसेच कोमल निवृत्ती रामनबैनवाड वय २६ वर्ष ग्रामपंचायत अधिकारी,ग्रुप ग्रामपंचायत खारगाव खुर्द वर्ग-३ यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या संदर्भात म्हसळा पोलीस ठाणे दैनंदिनी नोंद क्रमांक २३/२०२६, दि.०५/०३/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे.मौजे सकलप,ता.म्हसळा येथील सर्व्हे नं. १५/२ या जागेवर घर बांधण्यासाठी ना हरकत दाखला मिळविण्यासाठी जमीन मालक मुसर्रत जमादार यांनी ग्रुप ग्रामपंचायत खारगाव खुर्द येथे अर्ज केला होता.त्या अर्जाच्या पाठपुराव्यासाठी तक्रारदाराला जमीन मालकाकडून संमतीपत्र देण्यात आले होते.या प्रकरणी ना-हरकत दाखला देण्यासाठी आरोपी बबन कांबळे यांनी ५,००० रुपये तर कोमल रामनबैनवाड यांनी ३,००० रुपये लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.तडजोडीनंतर प्रत्येकी ४,००० रुपये देण्याचे ठरले.

याबाबत तक्रारदाराने दि.५ मार्च २०२६ रोजी अँटी करप्शन ब्युरो रायगड-अलिबाग येथे तक्रार दिल्यानंतर पथकाने पडताळणी कारवाई केली.दुपारी १५:३९ ते १६:०१ या वेळेत झालेल्या पडताळणीत दोन्ही लोकसेवकांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.यानंतर ग्रुप ग्रामपंचायत खारगाव खुर्द कार्यालयात सापळा रचण्यात आला.त्यावेळी कोमल रामनबैनवाड यांनी तक्रारदाराकडून ४,००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना सायंकाळी १७:०४ वाजता पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले.त्यानंतर बबन कांबळे यांना १७:४० वाजता पंचायत समिती कार्यालय म्हसळा येथून ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे,सुहास शिंदे, पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक निशांत धनवडे तपास अधिकारी तसेच विनोद जाधव, अरुण करकरे,महेश पाटील,परम ठाकूर,सुमित पाटील,सचिन आटपाडकर,सागर पाटील,नवदीत नांदगांवकर,वाकोजी कोलमकर, अनंत परत,मोनिका गोरे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

ग्रामपंचायत खरगाव खुर्द येथील कारवाईने अनेक सरकारी बाबूंचे धाबे दनाणाले आहेत. दरम्यान या मोठ्या कारवाईने म्हसळा तालुक्यातील सरकारी कार्यालयांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात विविध शासकीय कामाकाजांसाठी पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे उघड होत आहे परंतु काही नागरिक कामे लवकर व्हावीत आणि सरकारी बाबूंचा रोष का ओढवून घायचा असा विचार करून तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फावले आहे. नागरिकांनी पुढे येऊन भ्रष्टाचार रोखण्यास मदत केली पाहिजे.

प्रशासकांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

दरम्यान,पंचायत समिती,जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमण्यात आलेले काही प्रशासक विकासकामांच्या देयकांसाठी ठेकेदारांकडून साधारण दोन टक्के रक्कम घेत असल्याचे आरोप माजी सभापती महादेव पाटील यांनी केले आहेत. ज्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत त्या ठिकाणच्या कामांची व संबंधित अधिकारी यांची शासनाने सखोल चौकशी करावी.या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होत नसतील तर प्रशासक नेमण्याऐवजी १९८७ प्रमाणे पुढील कारभार माजी लोकप्रतिनिधींकडे सोपविण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा अशीही मागणी पुढे येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news