AI lessons for police to stop criminals
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, तपास प्रक्रियेत गती आणावी आणि कामाची गुणवत्ता वाढवावी, या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित एकदिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.३) पार पडली. या कार्यशाळेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड आणि धाराशिव येथील पोलिस अधिकारी, अंमलदार आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना वीरेंद्र मिश्र यांनी सांगितले की, गुन्-हेगार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने पोलिसांनीही एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तपास प्रक्रियेची अचूकता आणि परिणामकारकता वाढवणे अत्यावश्यक आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास पोलिस प्रशासन अधिक पारदर्शक व लोकाभिमुख होऊ शकते. एआय ही केवळ आधुनिकता नसून, भविष्यातील गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेत आयटी तज्ज्ञ प्रा. सतवशील जगदाळे (सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे) आणि सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ विश्वेश देशमुख यांनी एआयच्या विविध टुल्स, त्यांचा वापर, गुन्हेगारी पॅटर्न, व्हिज्युअल ट्रॅकिंग, सीसीटीव्ही व व्हिडीओ विश्लेषण, सायबर गुन्ह्यांचा तपास, फसव्या कागदपत्रांची पडताळणी, पुरावे व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती दिली.
ही कार्यशाळा आयजी वीरेंद्र मिश्र, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. यशस्-वीतेसाठी उपअधीक्षक विष्णु भोये, संजय देशमुख, सम्राटसिंग राजपूत, अण्णासाहेब वाघमोडे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी अन्नपूर्णा सिंह यांनी सर्वांचे आभार मानले.
एआय टुल्सच्या सहाय्याने कमी वेळेत अधिक प्रभावीपणे काम करता येते, मानवी चुका कमी होतात, तसेच डेटा आधारित निर्णय अधिक सुरक्षितपणे घेता येतात, असे तज्ञांनी सांगितले.