

गंगापूर : राज्याचे माजीमंत्री, जनतेचे नेते अशोक पाटील डोणगावकर यांच्या पार्थिवावर गंगापूर तालुक्यातील डोणगाव येथे रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ पुत्र किरण पाटील डोणगावकर यांनी त्यांना मुखाग्नी दिला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आणि अंतिम निरोपासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोकांनी गर्दी केली होती.
राजकीय, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात भक्कम योगदान देणाऱ्या अशोक पाटील डोणगावकर यांच्या निधनाने एक युग संपल्याची भावना सर्वसामान्य जनतेपासून राजकीय नेतृत्वापर्यंत दिसून आली. याप्रसंगी मंत्री मेघनाताई बोर्डीकर, खा. डा. कल्याण काळे, संदीपान भुमरे, बाळासाहेब थोरात, आ. सतीश चव्हाण, आ. प्रशांत बंब, आ. प्रा. रमेश बोरनारे, आ. सीमाताई हिरे, आ. अब्दुल सत्तार मा.खा. चंद्रकांत खैरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण, समाजकारण, राजकारण, उद्योग, व्यापार या सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा अवीट ठसा निर्माण करणाऱ्या या लाडक्या नेत्याला निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले.
अशोक पाटील डोणगावकर यांची अंत्ययात्रा सकाळी ११ वा. त्यांच्या रहात्या घरापासून काढण्यात आली यावेळी पोलिसांनी तिरंग्या ध्वजामध्ये त्यांचा मृतदेह गुंडाळण्यात आला होता. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना शासकीय प्रोटेकालप्रमाणे पोलिस प्रशासनाकडून हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारच्यावतीने मंत्री मेघना बोर्डीकर यांनी अशोक पाटील डोणगावकर यांना पुष्पचक्र वाहिले.
प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी मा. डॉ. अरुण जऱ्हाड, गंगापूरचे तहसीलदार नवनाथ वगनाड यांनी पुष्पचक्र अर्पण केले. याप्रसंगी माजी आमदार सुधीर तांबे, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार किशोर पाटील, माजी आमदार नितीन पाटील, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, बीडचे माजी आमदार राजेंद्र जगताप, उद्योगपती मानसिंग पवार, माजी आमदार अण्णासाहेब माने, माजी आमदार नामदेव पवार, शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी.चव्हाण, पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, रवींद्र काळे, विलास बापू औताडे, सुधाकर सोनवणे, भगवान नाना तांबे, भाऊसाहेब काका ठोंबरे, लासुर स्टेशन बाजार समितीचे सभापती शेषराव नाना जाधव, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाडे, विनोद तांबे, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.तत्पूर्वी त्यांच्या निवासस्थानी मंत्री अतुल सावे, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, फुलंब्रीच्या आमदार अनुराधाताई चव्हाण माजी आमदार एम.एम. शेख,यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
याप्रसंगी बोलताना वक्त्यांनी अशोक पाटील डोणगावकर यांनी त्यांच्या कार्यकाळात नांदूर मधमेश्वर कॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला पाणी उपलब्ध करून देणारी महत्त्वकांक्षी योजना, जनहिताचे शिल्लेगाव आणि टेंभापुरी मध्यम प्रकल्प, दोन्ही तालुक्यात अनेक पाझर तलाव, सरकारी दवाखाने, गावांतर्गत जोड रस्ते आणि शिवरस्ते, महत्वकांक्षी नागपूर मुंबई प्रकल्प, अनेकांच्या हाताला रोजगार देणारी वाळूज पंढरपूर एमआयडीसीची उभारणी करून गंगापूर खुलताबाद तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
राज्याने एक दीपस्तंभ गमावल्याच मंत्री मेघनाताई साकोरे- बोर्डीकर यांनी सांगितलं. तर अशोक पाटील डोणगावकर यांचं विविध क्षेत्रातील कार्यकर्तृत्व फक्त तालुकाच नव्हे तर राज्यासाठी आदर्श असल्याच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात म्हणाले. आमदार प्रशांत बंब म्हणाले की, अशोक पाटील डोणगावकर यांच्याकडे विकासाच व्हिजन होतं. त्यांच्या जाण्याने मतदार संघाच न भरून येणार नुकसान झालं आहे.
खासदार डॉ. कल्याण काळे यांनी डोणगावकर परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वरने द्यावी अशी प्रार्थना करताना दादाच्या कार्यकाळातल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, शेवगाव पाथर्डीच्या आमदार आणि अशोक पाटील डोणगावकर यांच्या कन्या मोनिकाताई राजळे यांचे दिर राहुल दादा राजळे यांनीही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.