Sambhajinagar News : एआय उपचारासाठी उपयुक्त मात्र, डॉक्टरांच्या संवेदनशीलतेला पर्याय नाही file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : एआय उपचारासाठी उपयुक्त मात्र, डॉक्टरांच्या संवेदनशीलतेला पर्याय नाही

एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा प्रभावी वापर केल्यास डॉक्टरांना अधिक अचूक व परिणामकारक औषधोपचार करता येतील. मात्र, एआय हे कधीच डॉक्टरांची जागा घेऊ शकणार नाही.

पुढारी वृत्तसेवा

AI is useful for treatment, but there is no substitute for a doctor's sensitivity

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा प्रभावी वापर केल्यास डॉक्टरांना अधिक अचूक व परिणामकारक औषधोपचार करता येतील. मात्र, एआय हे कधीच डॉक्टरांची जागा घेऊ शकणार नाही. डॉक्टरांमध्ये रुग्णांप्रती संवेदनशीलता, कर्तव्यांची जाणिव आणि जबाबदारीचे भान असते. ते 'एआय'मध्ये नाही. असे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे (एनएमसी) अध्यक्ष डॉ. अभिजात शेठ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या दीक्षांत समारंभानंतर डॉ. सेठ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गीते, एमजीएमचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी उपस्थित होते. देशातील डॉक्टरांच्या उपलब्धतेबाबत बोलताना डॉ. शेठ म्हणाले, केरळसह काही राज्यांनी दर एक हजार लोकसंख्येमागे एक डॉक्टर हे जागतिक मानक गाठले आहे. मात्र, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये अद्याप ही तफावत दिसून येते.

त्यामुळे संपूर्ण देशाची गरज विचारात घेऊन समतोल प्रमाणात गुणवंत डॉक्टर घडवण्यावर एनएमसीचा भर आहे. प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या धोरणामुळे वैद्यकीय संस्थांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत वैद्यकीय शिक्षकांची कमतरता भासत असल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

यावर डॉ. शेठ म्हणाले, भारतीय वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा चांगला असल्याने आज जगभरात भारतीय डॉक्टरांच्या सेवा देत आहे. भविष्यातही वैद्यकीय शिक्षणाचा उच्च दर्जा कायम राखण्यासाठी एनएमसीकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत.

आरोग्यसेवा अधिक सक्षम

डॉक्टरांमध्ये केवळ वैद्यकीय ज्ञान नव्हे, तर बदलत्या काळानुसार विविध गुणवत्तापूर्ण कौशल्ये विकसित करण्यावरही भर दिला जात आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि मानवी संवेदनशीलता यांचा समन्वय साधून भविष्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. शेठ यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT