

JEE Main and Board oral exams scheduled for the same time
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा आणि जेईई मेनच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा एकाच कालावधीत आल्याने छत्रपती संभाजीनगरमधील विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा बारावीच्या लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होण्याचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.
परंतु, बारावीच्या प्रात्याक्षिक, तोंडी आणि अंतर्गत परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. नेमक्या याच काळात, म्हणजेच २२ जानेवारीपासून अभियांत्रिकी प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या 'जेईई मेन' परीक्षेचे पहिले सत्र सुरू होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून दरवर्षी राज्य मंडळाच्या परीक्षेसाठी ६० ते ६५ हजार विद्यार्थी प्रविष्ट होतात, तर जेईई मेनसाठी २२ ते २५ हजार विद्यार्थी असतात. दोन वर्षे या परीक्षेची कसून तयारी करणारे विद्यार्थी एकाच वेळी दोन महत्त्वाच्या परीक्षा आल्यामुळे प्रचंड तणावाखाली आले आहेत. तारखांच्या या घोळामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर आणि कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे राज्य मंडळाने आणि संबंधित यंत्रणेने वेळापत्रकात तातडीने योग्य तो बदल करावा, अशी आर्त हाक एस. अनु, संदीप जैन, हिना पंजाबी आणि सुरेश मिश्रा यांसह संतप्त पालकांनी दिली आहे.