Agro Logistics Park : 'समृद्धी' लगतच्या ॲग्रो लॉजिस्टिक पार्कमधून होणार शेतमाल निर्यात File Photo
छत्रपती संभाजीनगर

Agro Logistics Park : 'समृद्धी' लगतच्या ॲग्रो लॉजिस्टिक पार्कमधून होणार शेतमाल निर्यात

३० कोटी खर्चुन गोदाम, सायलो, ग्रेडिंग यार्ड, ट्रक टर्मिनसची उभारणी

पुढारी वृत्तसेवा

Agricultural products will be exported from the Agro Logistics Park adjacent to 'Samriddhi'

छत्रपती संभाजीनगर : सुनील कच्छवे महामार्गाद्वारे समृद्धी मराठवाड्यातील शेतमालाला थेट जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. राज्य सरकारने घोषित केलेल्या चार अॅग्रो-लॉजिस्टिक पार्कपैकी पहिला आणि अत्याधुनिक पार्क छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांबरगाव येथे उभारण्यात आला आहे.

सुमारे ३० कोटी रुपये खर्चुन साकारलेल्या या प्रकल्पामुळे शेतमालाची साठवणूक, प्रतवारी आणि निर्यात आता प्रचंड वेगवान होणार असून, हा पार्क शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे २५ एकर जागेवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला आहे. या ठिकाणी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल थेट समृद्धी महामार्गावरून मुंबईतील जेएनपीटी बंदरात पाठवून निर्यात करणे शक्य होणार आहे. सध्या पार्कचे काम पूर्ण झाले असून, केवळ विद्युत जोडणी बाकी आहे. लवकरच हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल होईल.

जागतिक दर्जाच्या सुविधा एकाच छताखाली

  • विशाल साठवणूक क्षमता : १०,००० मेट्रिक टन क्षमतेचे अत्याधुनिक सायलो आणि १०,००० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम.

  • प्रतवारी आणि स्वच्छता : धान्य, फळे आणि भाजीपाल्यासाठी स्वतंत्र स्वच्छता आणि प्रतवारी (ग्रेडिंग) यार्ड.

  • वाहतूक सुलभता : मोठे ट्रक टर्मिनल आणि पेट्रोल पंपाची सोय.

  • इतर सुविधा : शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी सामाजिक सुविधा केंद्र (फॅसिलिटी सेंटर)

एक पार्क साकार, तीन अजूनही प्रतीक्षेत

राज्य सरकारने समृद्धी महामार्गालगत चार ठिकाणी ग्रो-लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे नियोजन केले होते. मात्र, जांबरगाव वगळता उर्वरित तीन पार्कची योजना अद्याप कागदावरच आहे. नागपूर विभागातील वर्धा येथे 'कॉटन लॉजिस्टिक पार्क'साठी १० एकर जागा ताब्यात आली असली तरी, वाशिममधील पार्कसाठी जागेची प्रक्रिया सुरू आहे. या उर्वरित प्रकल्पांसाठी निधीची प्रतीक्षा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT