

Jayakwadi Dam is 70 percent full
पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील जायकवाडी धरणात आवक वाढल्याने गुरुवारी (दि. १०) धरण ७० टक्के भरले. कालव्याव्दारे माजलगाव धरणात पाणी सोडण्यासाठी येथील पाटबंधारे विभागावर राजकीय वाढता दबाव येत असल्याची चर्चा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये होत आहे.
नाथसागर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली असली तरीही गुरुवारी दुपारी या धरणात ६९.२६ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. २० हजार ६८९ क्युसेक आवक सुरू असल्याची माहिती नियंत्रण कक्षातून प्राप्त झाली. सदरील नाथसागर धरणातून माजलगाव धरणात पाणी सोडण्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे ८१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाल्यावर माजलगाव धरणात पाणी सोडण्याचा विचार केला जाऊ शकतो.
आतापर्यंत पाणी सोडण्यासंदर्भात वरिष्ठ विभागाचे आदेश प्राप्त नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली. माजलगावला पाणी सोडण्यासाठी काही अधिकाऱ्यांवर बीड जिल्ह्यातून राजकीय दबाव येत असल्याची चर्चा या परिसरात होत आहे.