Agitation over the Shivna-Takli water issue meets with success
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शिवना टाकळी प्रकल्पाच्या पाणीप्रश्नावरून गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या शिवना टाकळी पाणी बचाव संघर्ष समितीच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे तोंडी आश्वासन दिल्यानंतर बुधवारी (दि. २५) दुपारी हे उपोषण मागे घेण्यात आले.
वाढता लोकक्षोभ लक्षात घेऊन सिंचन विभागाचे मुख्य अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे आणि कार्यकारी अभियंता शाहेदा शहापुरे यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चचर्चा करण्यात आली.
या आंदोलनाला तालुक्यातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचा मोठा पाठिंबा मिळाला होता उपोषण सोडण्याच्या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय मोठे, भाजप तालुकाप्रमुख ललित सुरासे, सामाजिक कार्यकर्ते सुनील बोडखे, शिवराज शेळके, विजय हारदे, अविनाश डगळे, भरत आहेर, वैभव आहेर, भगवान बारगळ, अतुल गायकवाड, भगवान गायकवाड, सागर पवार, भरत पवार, रामहरी बोर्डे, रमेश देशमुख, संतोष गायकवाड, उद्धव नरोटे, भास्कर गायकवाड, भाऊसाहेब पवार, रवी मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील ग्रामस्थ व आंदोलक उपस्थित होते.
अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन
गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाकडे गोदावरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. त्यामुळे उपो-षणकर्त्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता.
दरम्यान, प्रकल्पातील पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करणे तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास शेतकऱ्यांसह पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.