छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तोतया आयएएस कल्पना भागवतचे पाकिस्तान कनेक्शन समोर आल्यानंतर यंत्रणा अलर्ट झाल्या असून, तिचा अफगाणी मित्र अशरफला शुक्रवारी (दि. २८) रात्री उशिरा शहर पोलिसांच्या पथकाने दिल्ली येथून उचलल्याची माहिती समोर येत आहे. यासोबतच टोळीतील केंद्रीय गृहमंत्र्यांचा ओएसडी सांगणारा भामटाही पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान, दुबई कनेक्शनबाबत मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
खाडाखोड केलेले आधार कार्ड, बनावट आयएएसची २०१७ ची निवड यादी बाळगून स्वतःचे घर शहरात असताना पंचतारांकित अॅम्बेसेडर हॉटेलात सहा महिने मुक्काम ठोकणाऱ्या कल्पना भागवतला शनिवारी (दि.२२) सिडको पोलिसांनी अटक केली होती.
दिल्ली येथे ड्रायफूटचा व्यवसाय करणारा अफगाणिस्तानचा अशरफ खील याच्यासोबत तिची मैत्री झाली. त्यानंतर तिच्या बँक खात्यात ३२ लाखांची उलाढाल झाली. अशरफचा पाकिस्तानमधील भाऊ गालिब यमा याच्यासोबत ती सातत्याने संपर्कात होती. त्याच्यासोबतच चॅटिंग तिने डिलिट केल्याचे समोर आले. तिच्या मोबाईलमध्ये अपना डीलर पाकिस्तान में हैं, मालूम है ना, असा मजकूर असलेला स्क्रीन शॉट आढळून आला. तसेच पाकिस्तान आर्मीसह अफगाण दूतावास, दुबईसह ११ संशयास्पद नंबर तिच्या मोबाईलमध्ये सापडल्याने प्रकरण गंभीर बनले आहे.
तिला उचलल्याचे समजताच अशरफ आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचा ओएसडी अभिषेक चौधरी नावाने तोतयेगिरी करणारा भामटा भूमिगत झाला होता. मात्र शहर पोलिसांच्या पथकाने दोघांना दिल्ली व अन्य ठिकाणाहून शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. सिडको पोलिसांनी कल्पनाशी संबंधित पाच ते सहा जणांची शुक्रवारी कसून चौकशी केली. त्यात काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे प्रकरण हेरगिरीचे आहे की तोतयेगिरीचे याचे गूढ अद्यापही कायम आहे. पोलिस आयुक्तांनी घेतला आढावा.
कल्पनाची केंद्रीय तपास यंत्रणा, आयबी, एटीएस, सीआयडीकडून कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी प्रभारी पोलिस आयुक्त वीरेंद्र मिश्र यांनी सिडको पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, पोलिस निरीक्षक अतुल येरमे, तपास अधिकारी एपीआय योगेश गायकवाड यांच्याकडून प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला. सुमारे तासभर ते ठाण्यात होते.