

The queue for the darshan of Khanderaya continues.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: चंपाषष्ठीनिमित्त खंडोबाच्या यात्रेने सातारा गाव खंडेरायाच्या भक्तीत न्हाऊन निघाले असून, दर्शनाला भाविकांची सतत रांग दिसून येत आहे. बुधवारी झालेली चंपाषष्ठी उत्साहात पार पडल्यावर गुरुवार आणि शुक्रवारीही (दि.२८) येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, खंडोबाच्या नावाने चांगभले, अशा गजरात भक्तांची गर्भगृहात दर्शनासाठी गर्दी कायम आहे.
यात्रेनिमित्त खंडेरायाच्या मंदिराचा गाभारा झेंडूच्या माळांनी सजविण्यात आला होता. चंपाषष्ठीच्या तुलनेत शुक्रवारी भाविकांची संख्या कमी असली तरी दिवसभर दर्शनासाठी येणाऱ्यांची सततची वर्दळ कायम होती. स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात आल्या होत्या. भाविकांनी सोबत आणलेल्या पुडीतील भंडारा खंडोबारायाच्या चरणी
अर्पण केला. यात्रेनिमित्त आकाश पाळणे, खेळण्यांची दुकाने व सांस्कृतिक कार्यक्रमांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान दर्शन रांगेसाठी लोखंडी बॅरिकेट, सीसीटीव्ही निगराणी, मनपा कर्मचारी, दोनशे स्वयंसेवक आणि पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.