

A cleaning contractor became a drug smuggler after falling into debt
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : साफसफाईच्या कामाची ठेकेदारी करताना कर्जबाजारी झाल्याने थेट ड्रग्ज तस्करी सुरू करणाऱ्या एकाला एनडीपीएसच्या पथकाने सापळा रचून वेड्या ठोकल्या. ही कारवाई गुरुवारी (दि.२८) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सत्यविष्णू हॉस्पिटलच्या मागील रस्त्यावर, एन-१२ भागात करण्यात आली. रमीज बेग ईसा बेग (३५, रा. रोजाबाग, मौलाना आझाद कॉलेजच्या मागील गल्लीत) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, एनडीपीएस पथक गस्तीवर असताना त्यांना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास सिटी चौक हद्दीत रमीज बेग हा मोपेडवर एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने रात्री साडेअकराच्या सुमारास सापळा लावला. सत्यविष्णू हॉस्पिटल, एन १२ च्या मागील रस्त्यावर साडेबाराच्या सुमारास आरोपी रमीज मोपेड येताना दिसला. त्याला थांबण्याचा इशारा करताच तो घाबरून पळत असताना पडल्याने त्याच्या हाताला व पायाला जखम झाली. त्याला पोलिसांनी पाठलाग करून अखेर पकडले. त्याच्या अंगझडतीत ७५ ग्रॅम एमडी पावडर मिळून आली. ही कारवाई पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रविकांत गच्चे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, जमादार लालखा पठाण, अंमलदार नितेश सुंदर्डे, सतीश जाधव, काळे यांच्या पथकाने केली.
नागपूरहून आणून शहरात विक्री
आरोपी रमीज बेग आरोपी रमीज हा नागपूर येथील ड्रग्ज डीलरकडून गेल्या अनेक दिवसांपासून माल आणून शहरातील पेडलर्सला विक्री करत होता. २ हजार रुपये ग्रॅम प्रमाणे प्युअरचा माल आणून इकडे मिक्स केला जायचा असे सूत्रांनी सांगितले.
साफसफाईचे ठेके घेतानाच नशेच्या आहारी
सूत्रांच्या माहितीनुसार, रमीज हा मनपा व अन्य ठिकाणची साफसफाईची कामे घेण्याचा. त्यातच तो नशेच्या आहारी गेला. ठेकेदारी घाट्यात गेल्याने मध्यंतरी कर्जबाजारी झाला. त्यामुळे त्याने थेट ड्रग्ज तस्करी सुरू केली.
या धंद्यात चांगलेच हातपाय पसरून त्याने शहरातील मेन ड्रग्ज डीलर म्हणून काम सुरू केले. त्याच्या मोबाईलमधील डेटा तपासणी सुरू असून, अन्य पेडलर्स रडारवर आले आहेत.दोन दिवस पथक रात्रभर जागेच खबऱ्याने माहिती दिल्यानंतर एनडीपीएसच्या पथकाने बुधवारी रात्री सापळा लावला. मात्र तो मध्यरात्रीपर्यंत नियोजित ठिकाणी आलाच नाही. पहाटे पाच वाजता पथक गेल्यानंतर त्याने येऊन माल वितरित करून घरी जाऊन झोपला. याची माहिती मिळताच पथकाने पुन्हा गुरुवारी रात्री सापळा लावून त्याच्या अखेर मुसक्या आवळल्याच. तो पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आला आहे.