Administration's hammer on encroachment on Gayran land
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा: गंगापूर शहरातील लासूर रोडवरील डंपिंग ग्राउंडसमोरील शासकीय गायरान जमिनीवरील अनेक वर्षांपासूनचे अतिक्रमण अखेर शुक्रवारी प्रशासनाने कडक पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केले. जेसीबीच्या सहाय्याने झोपड्या तसेच शेतातील उभी पिके पाडण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या या मोठ्या कारवाईत एकूण ९ कुटुंबांचे अतिक्रमण हटवण्यात आले.
मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद, तहसील विभाग आणि गंगापूर पोलिस ठाण्याचे मोठे पथक सकाळीच घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांच्या कडक बंदोबस्तात जेसीबी मशिन्स सज्ज करण्यात आली होती. परिसरातील नागरिकांमध्ये कारवाईची चर्चा रंगली होती. प्रशासनाने अतिक्रमणधारकांशी गेल्या काही महिन्यांत अनेक बैठका घेऊन चर्चा केली होती. अतिक्रमण धारकांनी प्रत्येकी २ ते ३ एकर शेतीजमीन, मोफत घरे देण्याची मागणी केली होती. प्रशासनाने घरकुल संकुलातील घरे देण्यास मान्यता दिली; मात्र जमीन देण्यास नकार दिल्याने अतिक्रमणधारकांनी सहकार्य करण्यास नकार दर्शविला.
पिकांसह हटवले अतिक्रमण
कारवाईदरम्यान सहा कुटुंबांनी प्रशासनाच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देत घरांचा ताबा स्वीकारला. उर्वरित तीन कुटुंबांनी पिके काढण्यासाठी वेळ मागितला; मात्र ठोस सहकार्य न मिळाल्याने प्रशासनाने पिकांसह अतिक्रमण हटवले. नांगर फिरवत शेतातील पिके जमीनदोस्त करण्यात आली.
अतिक्रमण काढा, अन्यथा कारवाई
शासकीय जमिनीवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. नागरिकांनी स्वखुशीने अतिक्रमण काढावे, अन्यथा कठोर कारवाई होईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला.