Administration ready in Paithan for municipal council elections
पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण नगरपरिषद निवडणूक मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून, शहरातील विविध प्रभागांत ४४ मतदान केंद्रांवर एकूण ३७ हजार ८०५ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजवणार आहेत. यामध्ये महिला मतदार १८ हजार ६४४ असून, पुरुष १९ हजार १६१ एकूण मतदार आहेत.
प्रत्यक्ष निवडणुकीचे कामकाज हाताळण्यासाठी ५०० कर्मचारी सह ३०० पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, निवडणूक सह अधिकारी तहसीलदार ज्योती पवार, सहाय्यक निवडणूक अधिकारी मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांनी दिली आहे.
आज मंगळवारी रोजी १ नगराध्यक्ष व २१ नगरसेवक पदासाठी मतदान घेण्यात येत आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक साहित्य पोहोच झाले. यामध्ये ११८ मतदान ईव्हीएम मशीन, इतर साहित्य कर्मचाऱ्यासह पोलिस बंदोबस्तात वाहन पूजन निवडणूक निर्णय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, मुख्याधिकारी डॉ पल्लवी अंभोरे, नायब तहसीलदार प्रभाकर घुगे यांच्या हस्ते करून रवाना केले. मतदान केंद्रावर मशीन ना दुरुस्त झाल्यास तात्काळ नवीन ४४ ईव्हीएम मशीन राखीव ठेवण्यात आले.
मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मास्टर ट्रेनर कर्मचारी पथक तयार ठेवण्यात येऊन निवडणूक कामकाजासाठी २२ खासगी वाहन उपलब्ध करण्यात आले असून, शहरांमधील जैन इंग्लिश स्कूलमध्ये खास महिलांसाठी पिंक मतदान केंद्र सुविधा उपलब्ध केली आहे. यासह प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राच्या हद्दीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस विभागाकडून विशेष पोलिस भरारी पथक तयार केले आहे.
२१ नगरसेवक पदासाठी मतदान
दरम्यान पैठण नगरपरिषद निवडणुकीत एक नगराध्यक्ष व २५ नगरसेवक पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग क्रमांक ३ अ, प्रभाग क्रमांक ६ अ, प्रभाग क्रमांक ६ व, प्रभाग क्रमांक ११ ब या चार प्रभागाची निवडणूक पुढे ढकलल्यामुळे आज सोमवार रोजी २ नगराध्यक्ष व २१ नगरसेवक पदासाठी मतदान होणार आहे.