Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : पोलिसांकडून प्राप्त यादीनुसारच शहरातील कॅफेंवर कारवाई : येडगे

दर महिन्याला होणार नियमित तपासणी : मनपा आयुक्तांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

Action against city cafes taken strictly based on the list received from the police: Yedge

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील कॅफेंवर करण्यात आलेल्या धडक कारवाईबाबत महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी ही कारवाई पोलिस प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार करण्यात आल्याचे गुरुवारी (दि. २५) पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तर यापुढे शहरातील कॅफेंची दर महिन्याला नियमित तपासणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिका आणि पोलिस प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी संयुक्तपणे मोहीम राबवत शहरातील ४९ कॅफेंवर कारवाई केली. या मोहिमेत महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने अनेक ठिकाणी टेबल, खुर्चा, टीव्ही स्क्रीन तसेच भिंतीसह विविध साहित्यावर हतोडा चालविला. या कारवाईनंतर संबंधित व्यावसायिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र ही कारवाई प्राप्त तक्रारींच्या आधारे आणि नियमानुसारच केल्याचा दावा गुरुवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी केला.

दरम्यान, शहरातील काही कॅफेंमध्ये अनैतिक आणि अश्लील प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पोलिस प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची पडताळणी करून पोलिसांनी संबंधित कॅफेंची यादी तयार केली. त्यानंतर ही माहिती महापालिकेकडे देण्यात आली. या यादीच्या आधारे महापालिका आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाईची मोहीम राबवली, असेही आयुक्त येडगे यांनी सांगितले.

या कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही कॅफेंमधील संरचनांवरही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मोहिमेमुळे शहरात मोठी चर्चा रंगली होती मात्र भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठ महापालिका अधिक सतर्क भूमिका घेणार असल्याचे आयुक्त येडगे यांनी यावेळी सांगितले. तसेच शहरातील सव कॅफेंची नियमित तपासणी केली जाणार असून, नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अस इशाराही त्यांनी दिला.

तोडफोड कारवाई अयोग्य

नियमभंग करणाऱ्या कॅफेंविरोधात प्रशासनाने जरूर कारवाई करावी, मात्र साहित्याची तोडफोड करणे हे कायद्यानुसार योग्य नाही. साहित्याची तोडफोड केल्यामुळे व्यवसाय पुन्हा उभा करण्यास आर्थिक अडचणींना समोरे जावे लागत आहे. तर काहींवर व्यवसाय कायमचा बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने नियमभंग करणाऱ्या अस्थापनांना नोटीस बजवावी. त्यात दिलेल्या वेळेत सुधारणा न झाल्यास दंडात्मक कारवाई करावी नसता त्यांना सील करण्याची कारवाई करावी, अशी मागणी कॅफेचालकांकडून करण्यात आली आहे.

नियमित तपासणी

कॅफेंवरील अलीकडील कारवाई ही एकदाच होणारी मोहीम नसून, पुढे ती नियमित स्वरूपात राबविण्यात येणार आहे. दर महिन्याला तपासणी करून नियमांचे उल्लंघन, अनधिकृत बांधकामे किंवा आक्षेपार्ह प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त येडगे यांनी स्पष्ट केले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT