Beed Encroachment Drive : फुलं दिली, समजावलं तरीही अतिक्रमण कायम!

नगरपालिका-वाहतूक पोलिसांची संयुक्त कारवाई; १० अतिक्रमणे हटवली
Beed Encroachment Drive
Beed Encroachment Drivepudhari photo
Published on
Updated on

बीड : "आता तोंडी सांगतो, पुढे कारवाई करू" असा इशारा देत हातगाडी धारकांना पुष्पगुच्छ देऊन समजावून सांगितले होते. मात्र नियमांची पायमल्ली थांबली नाही. अखेर नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा वाहतूक शाखेने संयुक्त कारवाईचा बडगा उगारत शहरातील विविध भागांतील १० अतिक्रमणे हटवून नियमभंग करणाऱ्यांना चांगलाच दणका दिला.

नगरपालिका मुख्याधिकारी शैलेश फडसे तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक वैभव पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. शहरातील नाल्यांवर, सार्वजनिक रस्त्यांच्या कडेला तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या हातगाडीधारकांवर ही कारवाई करण्यात आली.

Beed Encroachment Drive
Nanded traffic congestion issue : नांदेडकरांचा श्वास कोंडतोय; वाहतूक पोलिस ॲक्शन मोडवर

यापूर्वी संबंधितांना अनेकदा सूचना देण्यात आल्या होत्या. नाल्यांवर व्यवसाय करू नये, वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, अशी विनंतीही करण्यात आली होती. मात्र वारंवार सूचना करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेत कारवाई केली.

पावसाळ्यापूर्वी प्रशासनाचा ॲक्शन मोड

सध्या पावसाळ्याची चाहूल लागलेली असताना नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे पाण्याचा निचरा अडथळला जाऊन शहरात पाणी साचण्याचा धोका वाढतो. त्याचबरोबर रस्त्यांवरील अनधिकृत हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका निर्माण होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

या मोहिमेदरम्यान नाल्यांवर उभारलेल्या हातगाड्या हटविण्यात आल्या तसेच संबंधितांना पुन्हा अतिक्रमण न करण्याचा सक्त इशारा देण्यात आला.

वाहतूक, स्वच्छता आणि शिस्तीसाठी कारवाई

शहरातील वाढती वाहतूक कोंडी, सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण आणि स्वच्छतेच्या प्रश्नांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे प्रशासनाच्या या कारवाईचे अनेक नागरिकांनी स्वागत केले. सार्वजनिक जागा मोकळ्या झाल्यास वाहतुकीला गती मिळेल, तसेच पावसाळ्यातील संभाव्य अडचणीही टाळता येतील, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

Beed Encroachment Drive
Pimpri Chinchwad Police Action Prostitution: पिंपरी-चिंचवडमध्ये देहविक्रयाविरोधात पोलिसांची कडक मोहीम

मोहीम यापुढेही सुरूच राहणार

या कारवाईत शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी, जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचारी तसेच नगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने सहभाग घेतला. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरातील सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांविरोधातील मोहीम यापुढेही नियमितपणे सुरू राहणार आहे.

'पुष्पगुच्छ नंतर बुलडोझर'

अतिक्रमणधारकांना प्रथम समजावून सांगणे, जनजागृती करणे आणि नियमांचे पालन करण्याची संधी देणे हा प्रशासनाचा प्रयत्न होता. मात्र त्यानंतरही नियमभंग सुरू राहिल्याने अखेर कारवाईचा मार्ग स्वीकारावा लागला. त्यामुळे "फुलं दिली, पण नियम मोडल्यास कारवाई अटळ" असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे.

सूचना दुर्लक्षित कराल तर कारवाई अटळ : वैभव पाटील

"व्यापारी आणि हातगाडी चालकांना यापूर्वी समजावून सांगण्यात आले होते. नागरिकांना वेठीस धरून व्यवसाय करू नका, असे आवाहनही करण्यात आले. मात्र वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याचे दिसून आले. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन आवश्यक आहे. व्यापारी व हातगाडी चालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा यापुढेही कठोर कारवाई केली जाईल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news