छत्रपती संभाजीनगर : मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी एसआयआर (विशेष सखोल पुनरीक्षण) मोहीम सुरू आहे. या प्रक्रियेत कामचुकारपणा करणाऱ्या आणि कामात टाळाटाळ करणाऱ्या १२ बीएलओंवर (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी रूपेश शिंगारे यांनी सोमवारी (दि. २५) दिले.
एसआयआर मॅपिंगबाबत १०८ छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील सर्व पर्यवेक्षक व ६० टक्क्यांपेक्षा कमी मॅपिंग असलेले बीएलओ यांची आढावा बैठक सोमवारी (दि. २५) उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी रूपेश शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथील समिती सभागृहात घेण्यात आली आहे.
या बैठकीत जिल्हाधिकारी शिंगारे यांनी पश्चिम मतदारसंघातील सर्व सुपरवायझर यांना त्यांच्याकडील यादी भागाचे २ जून २०२६ पर्यंत मॅपिंगचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच कामात टाळाटाळ करणाऱ्या १२ बीएलओंवर कारवाईसाठी गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही शिंगारे यांच्याकडून देण्यात आले.
गैरहजर बीएलओ, पर्यवेक्षकांना कारणे दाखवा : उमेश पाटील
पश्चिम मतदारसंघात एसआयआर मॅपिंगचे ६० टक्के कमी काम असलेल्या प्रत्येक बीएलओ यांचा कामाचा आढावा घेण्यात आला. यानंतर असमाधानकारक असलेल्या बीएलओ यांनी १० दिवसांत काम पूर्ण करा, अन्यथा सक्त कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी उमेश पाटील यांनी दिला. तसेच आढावा बैठकीस गैरहजर असलेले बीएलओ व पर्यवेक्षक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देशही त्यांनी दिले.