Acid attack on mechanic changing bike tire
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जवाहरनगर कॉलनी परिसरातील विष्णूनगर येथे रविवारी (दि.८) सकाळी एका गॅरेजमध्ये काम करत असलेल्या मेकॅनिकवर अज्ञाताने अॅसिड फेकून जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात मेकॅनिकसह दुचाकीचे टायर बदलण्यासाठी आलेला ग्राहकही गंभीर जखमी झाला आहे. दोघांवरही घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, जवाहरनगर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सिराज नजीर शेख (२६, रा. भारतनगर, गारखेडा) आणि वैभव अनिलराव पुजदेकर (२५, रा. शेंद्रा) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिराज हे नेहमीप्रमाणे गॅरेजवर काम करत होते. दरम्यान, वैभव पुजदेकर हे आपल्या दुचाकीचे (एमएच ४४ पी ५४८०) टायर बदलण्यासाठी आले असता, दबा धरून बसलेल्या अज्ञाताने त्यांच्या दिशेने अॅसिड फेकले. या हल्ल्यात सिराज यांच्या कपाळावर, गालावर, पाठीवर आणि पायावर अॅसिड पडल्याने ते गंभीर भाजले आहेत, तर वैभव यांच्याही हाता-तोंडावर अॅसिड उडाले आहे.
पूर्वनियोजित हल्ल्याचा संशय घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. प्राथमिक तपासात आरोपींचे मुख्य लक्ष्य मेकॅनिक सिराज शेख हेच होते, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे. हा हल्ला पूर्वनियोजित असून, जुन्या वादातून झाला असावा, या दिशेने पोलिस तपास करत आहेत.
शॉर्टसर्किटचा समज आणि धावपळ
अॅसिड अंगावर पडताच दोघांनीही वेदनेने आरडाओरडा सुरू केला. अॅसिडच्या तीव्रतेमुळे कपड्यांतून धूर निघू लागल्याने परिसरातील नागरिकांना सुरुवातीला शॉर्टसर्किट झाल्याचा समज झाला. यामुळे काही काळ गोंधळ उडाला आणि लोक इकडे-तिकडे धावू लागले. दरम्यान, दोन्ही जखमींनी प्रसंगावधान राखून जवळच असलेल्या एका मिठाईच्या दुकानात धाव घेतली आणि अंगावर पाणी ओतून दाह कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.