Accused in police custody demands ransom from principal
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
पोलिसांच्या कोठडीत असलेल्या कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आरोपी मजहर खान याने फोनवरून खंडणीची मागणी करीत धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारमुळे खुलताबाद पोलिसांकडून आरोपी मजहर खानला व्हीआयपी सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत असून, तब्बल ५४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण पोलिस अधीक्षकांसह राज्याचे गृहमंत्री आणि राज्यापालांकडे तक्रार केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम. ए. पाठ्यक्रमाच्या परीक्षेचे सर्व पेपर दुसऱ्यांकडून लिहून घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी मझहर खानसह सहा जणांविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात ६ जून रोजी गुन्हा दाखल झाला. खुलताबाद पोलिसांनी डॉ. मझहर खानला मंगळवारी (दि.१७ जून) हर्मूल तुरुंगातून ताब्यात घेत अटक केली आणि त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान आरोपी मजहर खान हा खुलताबाद पोलिसांच्या कोठडीत आहे. पोलिस कोठडीत असताना आरोपी खानने गुरुवारी (दि.१९) कोहिनूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शेख कमरूनिसा बेगम इक्रमोद्दीन यांना दुसऱ्याच्या मोबाईल फोनवरून कॉल करत खंडणीची मागणी केली.
तसेच कोहिनूर महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी माझा काहीही संबंध नाही. मी या संस्थेचा सर्वेसर्वा असून, एका मिनिटात हे महाविद्यालय बंद करू शकतो, अशी धमकी देऊन आरोपी खानने भीतीचे वातावरण निर्माण केले असल्याची तक्रार कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुरुवारी ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. या तक्रारीच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, उच्च शिक्षण मंत्र्यांसह सर्व संबंधितांना पाठवण्यात आल्या आहेत.
आरोपी खान हा कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असून, स्वतः व दुसऱ्याच्या मार्फत माहिती अधिकारात महाविद्यालयाची माहिती मागवून धमकावत असून दहशत निर्माण करत आहे. महाविद्यालयातून सेवा पुस्तिका व इतर महत्त्वाचे दस्तावेज तो स्वतःकडे ठेवतो, हे पोलिस तपासातूनही समोर आले आहे.
मी या संस्थेचा बॉस असून कोणालाही नोकरीवरून काढून टाकू शकतो, अशा प्रकारची भाषा कर्मचाऱ्यांशी वारंवार वापरतो. सर्व कर्मचाऱ्यांना एका लाईनमध्ये उभे करून अर्वाच्च व एकेरी भाषेत शिवीगाळ करतो, कर्मचारी त्यांचे कर्तव्य पार पाडत नाहीत, अशा खोट्या तक्रारी करून शासनाची दिशाभूल करतो. महाविद्यालयात कुठल्याही पदावर नियुक्त नसलेले बाहेरचे गुंड प्रवृत्तीचे लोक आणून दहशत पसरवतो. त्यामुळे महिला प्राध्यापिका व विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात आली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.