Accident News: Four members of the same family die
पैठण : पुढारी वृत्तसेवा दुचाकी आणि चारचाकी पिकअप वाहनाच्या समोरासमोरील धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पैठण तालुक्यात विहामांडवा-चोंडाळा रस्त्यावर हा अपघात झाला. सिद्धार्थ चव्हाण (३०), पायल सिद्धार्थ चव्हाण (२७), आव्हान्या सिद्धार्थ चव्हाण (५) यांच्यासह चुलत भावजयी संजना अभिषेक चव्हाण (२२) यांचा मृत्यू झाला.
पाचोड येथील बाजारातून संसारोपयोगी साहित्य खरेदी करून सिध्दार्थ चव्हाण हे घरातील सदस्यांसह दुचाकीवरून गावाकडे खंडाळा येथे जात होते. विवाहमांडवा ते चौंडाळा रस्त्यावर शरद-रेणुकादेवी कारखान्याच्या परिसरात समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेनंतर वरील सर्व जण गंभीर जखमी होऊन जागेवरच बेशुद्ध पडले.
अपघाताची माहिती मिळतात पाचोड पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन पंडित, विहामाडवा पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक श्रीहरीविजय बोबडे सह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्धआवस्थेत रोडवर पडून असलेल्या सर्व जखमींना तातडीने पाचोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी सदरील जखमींना तपासून मृत घोषित केले. दरम्यान, पाचोड येथील आठवडी बाजार करून आनंदाने घरी परतणाऱ्या निष्पाप चव्हाण कुटुंबीयांचा संसार या एका भीषण अपघातामुळे एका क्षणात उद्ध्वस्त झाला आहे.
रात्री उशिरापर्यंत पंचनामा व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास सपोनि सचिन पंडित करीत आहेत.