पैठण : पैठण तालुक्यातील विहामांडवा-चोंडाळा मार्गावर पिकअप वाहन आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सिद्धार्थ भैया चव्हाण (वय 30), पायल सिद्धार्थ चव्हाण (वय 27), आव्हान्या सिद्धार्थ चव्हाण (वय 5), संजना अभिषेक चव्हाण (वय 22) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण खंडाळा-चोंडाळा, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून पारधी समाजातील असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक श्रीहरीविजय बोबडे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह व जखमींना तत्काळ पाचोड येथील शासकीय रुग्णालयात हलवून पुढील कार्यवाही सुरू केली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.