Accident near Panchakki; 400 kg of beef found in vehicle's boot
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात गोमांसची डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या कारचा पानचक्की गेटजवळ खांबाला धडकून अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तच्या डिक्कीत तब्बल ४०० किलो गोमांस बेकायदेशीरपणे वाहतूक केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना बुधवारी (दि. २९) सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. समीर दस्तगीर मदारी (२०, रा. देवगाव रंगारी, ता. कन्नड) असे अटकेतील तर कारचा चालक साहिल काला असे घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली.
बेगमपुरा ठाण्याचे अंमलदार फिर्यादी कमलेश काजळे हे डायल ११२ वर ड्यूटीवर असताना कंट्रोल रूमकडून त्यांना माहिती मिळाली की, जमील बेग मशीदसमोर एका कारचा अपघात झाला आहे. त्यांनी सहकारी रवीकुमार कांगणे सोबत घटनास्थळी धाव घेतली. एका लोखंडी खांबाला होंडा सिटी कार (एमएच-०२-एपी-६७५८) धडकलेल्या अवस्थेत आढळून आली.
पोलिसांनी कारची पाहणी केली असता, डिक्कीमध्ये मोठ्या प्रमाणावर मांस मिळून आले. महापालिका अवैध कत्तल पथकाचे प्रमुख लक्ष्मण फुले यांना बोलावून घेतले. त्यांनी डिक्कीतील मांस गोवंश जातीचे असल्याचे निष्पन्न केले. पोलिसांनी घटनास्थळावरून १ लाख २० हजार रुपये किमतीचे ४०० किलो गोमांस आणि कार जप्त केली. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक मारुती मडेवाड करत आहेत.
कसाबखेडा फाट्यावरून आले होते दोघे
कारमधील समीर मदारी याची चौकशी केली असता त्याने कारचा चालक साहील काला याने सकाळी कसाबखेडा फाट्यावरून मटणाची गाडी पास करण्यासाठी आपल्याला सोबत घेतल्याची कबुली दिली. ते हे मांस संभाजीनगर शहरातील एका मांस विक्रेत्या दुकानदाराकडे घेऊन जात होते, मात्र पानचक्कीजवळ अपघात झाल्याने कार बंद पडली. चालक साहील काला हा कार जागेवरच सोडून पळून गेला.