

A ' NEET' result is correct; The bench dismissed the petitions challenging the re-examination
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पेपरफुटीनंतर घेण्यात आलेल्या 'नीट' फेरपरीक्षेच्या निकालांना आव्हान देणाऱ्या चार याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी (दि. ३०) फेटाळून लावल्या. विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका खंडपीठासमोर सादर करण्यात आल्यानंतर त्याची पडताळणी झाली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर 'एनटीए'ने जाहीर केलेला निकाल योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीआधारे याचिका दाखल केल्याबद्दल न्यायालयाने प्रत्येक याचिकाकर्त्याला ५ हजार रुपयांचा दंड (कॉस्ट) ठोठावला आहे. न्यायालयाचा कल पाहून यापैकी दोन याचिकाकर्त्यांनी खंडपीठात विनंती करून याचिका मागे घेतली.
पेपरफुटीच्या घटनेननंतर 'नीट'ची देशभर फेरपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर चार विद्यार्थ्यांनी हा निकाल चुकीचा आणि तफावत असलेला आहे, असा दावा करीत खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. हे प्रकरण न्या. एन. बी. सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणीला आले. ऋचा प्रफुल्ल देशपांडे, सोहम नितीन गवते, अथर्व नरेंद्र जगताप आणि राहुल अरुण नाग या चार विद्यार्थ्यांच्या या याचिकांमध्ये चुकीची तपासणी झाल्याचा व चुकीचा निकाल जाहीर करण्यात आल्याचे म्हणणे मांडण्यात आले होते.
प्राथमिक सुनावणीत खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावून मूळ उत्तरपत्रिका मागवल्या होत्या. आजच्या सुनावणीत या मूळ उत्तरपत्रिका न्यायालयासमोर सादर करण्यात आल्या. मूळ उत्तरपत्रिकांची पडताळणी केल्यानंतर आणि दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने एनटीएने जाहीर केलेला निकाल योग्य असल्याने चारही याचिका फेटाळून लावल्या.
तसेच चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे याचिका केल्याबद्दल चारही याचिकाकर्त्यांवर प्रत्येकी ५ हजार रुपये कॉस्ट लावण्याचे आदेशही खंडपीठाने दिले. पैकी दोन याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतल्या. एनटीए आणि केंद्र शासनाच्या वतीने डेप्युटी सॉलिसिटर जनरल अॅड. अजय तल्हार आणि अॅड रोहित सर्वज्ञ यांनी काम पाहिले.