Accelerating the Sukhna River Rejuvenation Project
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने खामनदीचे पुनरुज्जीवन करीत दुर्गंधीमुक्त केली आहे. त्याप्रमाणेच प्रशासक जी. श्रीकांत यांनी आता सुखना नदीच्या पुनरुज्जीवनाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कामाला सुरुवातही झाली असून, या नदीला खाम नदीप्रमाणेच दुर्गंधी व केमिकलयुक्त पाणीमुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी चिकलठाणा ते विमानतळ संरक्षक भिंती साडेपाच किलोमीटर अंतरात नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.
ऐतिहासिक शहराचा वारसा लाभलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातून खान आणि सुखना या दोन नद्या वाहतात. मागील ५० वर्षांत या नद्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे. या नदीपात्रात ठिकठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. हे नाले नसून शहरातील नद्या आहेत, याचा विसरच नागरिकांना पडला आहे. त्यामुळे या नद्यांमध्ये ठिकठिकाणी ड्रेनेज वाहिन्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळेच नदीचे पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेत, छावणी परिषद व उद्योजकांच्या सहकायनि ही नदी पुनरुज्जीवित केली.
या कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नाक बंद करून ये-जा करणारे नागरिक आता खामनदी परिसरातील उद्यानात मोकळा श्वास घेत आहेत. खाम नदीनंतर आता महापालिकेने सुखना नदीला तिचे पूर्ववैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हर्सल ते चिकलठाणा विमानतळ संरक्षक भिंतीपर्यंत सुमारे ५ ते साडेपाच किमी मनपा हद्दीतील सुखना नदी वाहते.
नदीपात्राचे रुंदीकरण, खोलीकरण करणे, पिचिंग करणे, परिसरात वृक्षारोपण करणे, आदी विविध कामे करण्यात येणार आहेत. मनपाचे उद्यान निरीक्षक विजय पाटील, विशेष कार्य अधिकारी जयवंत कुलकर्णी यांच्यासह अधिकारी-कर्मचारी या प्रकल्पावर काम करत आहेत.
दिवाळीनंतर कामाला गती
या कामात नदीचे पात्र पूर्वीप्रमाणेच रुंद होणार आहे. तसेच नदीत येणारे केमिकलयुक्त पाणीही बंद केले जाणार आहे. दिवाळीनंतर या कामाला वेग आला असून, आतापर्यंत सुमारे १ किलोमीटरपर्यंतचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.