

Draft voter lists to be published on November 14
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला होता. त्यानुसार आज गुरुवारी (दि.६) प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या, मात्र मंगळवारी सायंकाळीच निवडणूक आयोगाने नवा आदेश जारी करीत प्रारूप मतदार याद्या प्रसिद्धीला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता १४ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या सार्वत्रिक अगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने ११५ वॉर्ड असलेल्या २९ प्रभागांच्या स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली होती.
आयोगाच्या आदेशानुसार या प्रारूप मतदार याद्या ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार होत्या. तसेच संपूर्ण प्रक्रियेसह याद्या नोव्हेंबरअखेरपर्यंत अंतिम केल्या जाणार होत्या. मात्र आता याद्यांचा संपूर्ण कार्यक्रमच बदलण्यात आला आहे. प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख आठ दिवस पुढे ढकली आहे. आता १४ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत.
त्यानंतर २२ नाव्हेंबरपर्यंत या प्रारूप याद्यांवर आक्षेप घेण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. या याद्यांवर दाखल होणाऱ्या आक्षेपांवर निर्णय घेऊन ६ डिसेंबरपर्यंत प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून त्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय असलेल्या याद्यांची फोड करून महापालिकेच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी करीत आहेत.
६ नोव्हेंबर रोजी याद्या प्रसिद्ध कराव्या लागणार असल्याने मंगळवारी महापालिका निवडणूक विभागाकडून या प्रारूप याद्यांचे अंतिम निरीक्षक करण्याचे काम सुरू होते. परंतु त्याच वेळी निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम महापालिकेला प्राप्त झाला.
मतदान केंद्रांची यादी...
महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्र निश्चित करून त्याची यादी येत्या ८ डिसेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश आयोगाने प्रशासनाला नव्या सुधारित वेळापत्रकामध्ये दिले आहेत. त्यासोबतच मतदार केंद्रनिहाय मतदार याद्याही १२ डिसेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्याबाबत या आदे-शात नमूद केले आहे.