Abhijeet Dipke File Photo
छत्रपती संभाजीनगर

Abhijeet Dipke : भाजप प्रवेशाची ऑफर, आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव

भाजपमध्ये येण्यास नकार दिल्यानंतर जिवे मारण्याच्या तसेच कुटुंबीयांना लक्ष्य करण्याच्या धमक्या देण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला.

पुढारी वृत्तसेवा

Abhijeet Dipke: Offer to join BJP, pressure to withdraw agitation

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मला भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आली. तसेच आंदोलन मागे घेण्यासाठी विविध माध्यमांतून दबाव टाकण्यात आला होता, असा गंभीर आरोप कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी गुरुवारी (दि.३०) पत्रकार परिषदेत केला. भाजपमध्ये येण्यास नकार दिल्यानंतर जिवे मारण्याच्या तसेच कुटुंबीयांना लक्ष्य करण्याच्या धमक्या देण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला.

दीपके यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीमार, दगडफेक आणि पोलिसांच्या कारवाईबाबत पूर्वनियोजन करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तसेच १९ तारखेच्या रात्री आणि २० तारखेच्या सकाळी मी स्वतः पाहिले आहे की, पोलिसांनी दगडांनी भरलेला एक ट्रक आणि आधीच तुटलेली एक व्हॅन तिथे आणून ठेवली होती. दगडफेकीचे नियोजन पोलिस आणि भाजपने मिळून केले होते.

याप्रकरणी आपण थेट डीसीपी यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला, असेही ते म्हणाले. पोलिसांनी संविधानाचे पालन करावे. त्यांना भाजपचेच समर्थन करायचे असेल तर त्यांनी थेट भाजपच्या मुख्यालयासमोर उभे राहून 'मैं भी चौकीदार' म्हणावे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच आंदोलनाला बाहेरून निधी मिळाल्याचा आरोप खरा असेल तर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अपयश असून, त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. तसेच विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जाचे आदेशही केंद्रीय गृहमंत्रालयातूनच दिले गेले असावेत, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

तसेच आंदोलनादरम्यान किसान नेत्यांनी दिलेला पाठिंबा मोलाचा होता. शेतकऱ्यांना जेव्हा आमची गरज भासेल, तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असे ते म्हणाले. तसेच रामदेव बाबांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या पतंजलीच्या उत्पादनांकडे लक्ष द्यावे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या उत्पादनांबाबत फसवणुकीची नोंद केली आहे, असेही दीपके म्हणाले. दरम्यान, गुरुवारी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार बच्चू कडू यांच्यासह विविध संघटनांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी दीपके यांची भेट घेतली.

बलात्काऱ्यांचे समर्थन करणारे सरकार !

केंद्र सरकार आणि नव्या शिक्षणमंत्र्यांवरही दीपके यांनी नाराजी व्यक्त केली. देशाचे शिक्षणमंत्री आता बलात्काऱ्यांचे स्वागत आणि कौतुक करत आहेत. प्रधान यांना हटवून सरकारने आणखी एक विचित्र माणूस त्या पदावर बसवला आहे. हे सरकार बलात्काऱ्यांचे समर्थन करणारे आहे, अशी टीका त्यांनी केली. सध्या झेन झी पिढीला जाणूनबुजून ट्रोल केले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.

आता महाराष्ट्रात आंदोलनाची गरज !

महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था ढासळली असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यात आंदोलन उभारणार असल्याचे अभिजीत दीपके यांनी सांगितले. निवडणुकांना प्राधान्य देणाऱ्या सरकारला शिक्षणाची चिंता नसल्याची टीका त्यांनी केली. एमपीएससी, टीईटी आणि भरती प्रक्रियेतील प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT