250 retirees from the municipal corporation are having to make rounds for their pension
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील सुमारे २५० हून अधिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मागील आठ वर्षांपासून हक्काच्या निवृत्तीवेतनासाठी आयुक्त आणि लेखा विभागाच्या खेट्या माराव्या लागत आहेत. त्यातील सुमारे ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप ग्रॅच्युइटी, रजा रोखीकरण व इतर लाभांची रक्कम मिळालेली नसून, ही थकबाकी आता ८० कोटींवर पोहोचली आहे.
महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी नियत वयोमानानुसार दरमहा १० ते २० कर्मचारी सेवानिवृत्त होतात. संपूर्ण आयुष्य मनपा सेवेत घालविल्यानंतर सेवानिवृत्तीचे दिवस सुखाने घालविण्याचे नियोजन सेवानिवृत्त कर्मचारी करतात, परंतु सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना हक्काची रक्कम मिळण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागते.
सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या प्रत्येक शासकीय कार्यालयाकडून कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी, रजा रोखीकरण, अंशराशीकरण व इतर मिळणाऱ्या-लाभांची रक्कम महिनाभरात अदा केली जाते, परंतु महापालिकेत या निवृत्तीनंतरच्या रकमेसाठी वर्षानुवर्षे खेट्या माराव्या लागत आहेत. ही रक्कम मिळविण्यासाठी लेखा विभागाकडे अर्ज केल्यानंतर मेरा नंबर कब आयेगा, हे विचारण्याशिवाय निवृत्तांकडे काहीच उरत नाही.
मनपाच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे कर्मचाऱ्यांची थकबाकी वाढली आहे. रक्कम कशी द्यावी, असा प्रश्न ₹500 प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. 11387 जीएसटी अनुदानातून वेतन व इतर अत्यावश्यक सेवासुविधांची बिले दिल्यानंतर उर्वरित रकमेतून कर्मचाऱ्यांची देणी दिल्या जाते, मात्र अत्यंत तुटपुंजी रक्कम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळते. मागील तीन वर्षांपासून साधारणपणे २५० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ८० कोटी रुपये थकले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लेखा विभागाकडून ज्येष्ठता यादी
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होत नसल्याने येणीपेक्षा देणीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कंत्राटदारांची २५० कोटींची देणी शिल्लक आहेत. त्यासोबतच सेवानिवृत्तांचेही ८० कोटी थकले आहेत. त्यासाठी कंत्राटदारांच्या कामांच्या ज्येष्ठता यादीप्रमाणेच आता सेवानिवृत्तांचीही ज्येष्ठता यादी लेखा विभागाने तयार केली आहे. त्या ज्येष्ठतेनुसार दरमहा सेवानिवृत्तांची देणी अदा केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.