Abdul Sattar's dominance over the cooperative sector of Soygaon
सिल्लोड/सोयगाव, पुढारी वृत्तसेवा : सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. पार पडलेल्या या निवडणुकीत चेअरमनपदी शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ राठोड यांची तर व्हाईस चेअरमनपदी रंगनाथ रामदास वराडे यांची माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या सूच-नेप्रमाणे सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीनंतर सोयगाव शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय सेना भवन समोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांच्या उपस्थितीत शहरात भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान एका खुल्या वाहनातून नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र राठोड, व्हाईस चेअरमन व संचालकांनी शहरवासीयांचा सत्कार स्वीकारून मतदार व नागरिकांचे आभार मानले.
शिवसेना भवन येथे नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र भाऊ राठोड व व्हाईस चेअरमन रंगनाथ वराडे यांच्यासह नवनिर्वाचित संचालकांचा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहरातून काढण्यात आलेल्या या विजयी आनंद जल्लाेषाच्या उत्सवाच्या मिरवणुकीत नवनिर्वाचित संचालक प्रभाकर काळे संजय निकम, सुभाष बोरसे, मुर-लीधर वेहळे, भगवान लहाने, राधेश्याम जाधव, गुलाबसिंग पवार चंदाबाई राजपूत, प्रतिभा सोळंके, भारत तायडे, मोतीराम पंडित तेली यांच्यासह शिवसेना शिंदे गट व शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
राजकारणात शिवसेनेचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या पलीकडे मैत्रीचे संबंध मोठ्याप्रमाणात तयार केलेले आहे. प्रत्येक पक्षात त्याचे अनेक मित्र असून त्याच्याबाबतीत मैत्री व शब्दाला कधीच तडा जाऊ देत नाही असे नुसते बोलले जाते असे नव्हेतर वेळोवेळी कृतीतून सिध्दही झालेले असून त्याची प्रचिती सोयगाव खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा दिसून आलेली आहे. आपल्या पॅनलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संचालक अधिक असतानाही त्यांनी दिलेल्या शब्दाला जागत संस्थेच्या चेअरमनपदावर शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र भाऊ राठोड यांना संधी देऊन आपण मैत्री व शब्दाचे धनी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.