

Sambhajinagar Encroachment campaign
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने शहरात नियमबाह्यरीत्या पाडापाडी सुरू केली आहे. अनधिकृत बांधकामे असेल तर पहिले नोटीस देणे आवश्यक होते. तसे न करताच प्रशासनाने कारवाई सुरू केली असून ही पाडापाडी तातडीने थांबविण्यात यावी, नसता आम्ही रस्त्यावर उतरू, जनआंदोलन उभारू, असा इशारा शनिवारी (दि. १९) गांधी भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत माजी नगरसेवकांनी दिला.
यावेळी माजी नगरसेवक कॉ. सय्यद अली अशफाक सलामी, माजी नगरसेवक इलियास किरमानी, कॉ. मधुकर खिल्लारे, अॅड विजय वानखेडे, माजी नगरसेवक गाजी सादोद्दीन (पप्पू कलानी), कॉ. अनिल थोरात यांची उपस्थिती होती. खंडपीठाने नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, असे असतानाही महापालिका नियमबाह्यरीत्या कारवाई करून घरे, दुकाने पाडत आहेत. पै पै जमा करून नागरिकांनी जागा घेऊन कसेबसे घर बांधले. मात्र, या घरांवर महापालिकेने कुठलाच विचार न करता सरळ पाडापाडीची कारवाई केली. यामुळे आज अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहेत. त्यासोबतच हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. प्रशासनाने आता तातडीने ही पाडापाडी थांबवावी नसता आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा पक्ष, संघटनांच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी दिला.
महापालिकेच्या या पाडापाडी मोहिमेला आता विरोध वाढत आहे. या कारवाईविरोधात अगोदर आनंदराज आंबेडकर यांनी मुकुंदवाडीत येऊन बाधितांची भेट घेतली होती. त्यानंतर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील, खासदार कल्याण काळे यांच्यानंतर आता आमदार प्रशांत बंब यांनी विधिमंडळात कारवाईवर ताशेरे ओढले. तर दोन दिवसांपूर्वी डॉ. गफ्फार कादरी आणि शनिवारी या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत घेत आंदोलनाचा इशारा दिला.