

petrol pump owner attacked varthan cinematic style
वरठाण : भ्रमणध्वनी वरुन झालेल्या वादातून पेट्रोल पंप मालक तरुणाला हॉकी स्टिक, कंबरेचा पट्टा आणि लाकडी दांडक्याने सिनेस्टाईल बेदम मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर जिवे मारण्याची तसेच पेट्रोलपंप जाळून टाकण्याची धमकी दिल्याची घटना वरठाण (ता.सोयगाव)येथे शुक्रवारी (ता. १८) बारा वाजता घडल्याने बनोटी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाडी (ता.सोयगाव) येथील तरुण अमोल सुदाम जंजाळ याने दिलेल्या फिर्यादीवरून यशवंत भिमराव राकडे,रा (कासोद ता सिल्लोड) व इतर चार असे पाच जणांविरोधात बनोटी दुरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पेट्रोलपंप चालक अमोल जंजाळ नित्यनियमाने आपल्या पेट्रोलपंपावर डिझेल भरण्याचे काम करीत असतांना कासोद (ता. सिल्लोड) येथील पाच तरुणांनी शिवीगाळ का केलीस अशी विचारणा करीत हॉकी स्टिक, लाकडी दांडाने डोक्याला, दोन्ही पायांना, मांडी, पाठीवर, पोठावर जबर मारहाण केल्याने अमोल रक्तबंबाळ झाला.
नातेवाईकांबरोबर बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन उशीरा बनोटी पोलीस दुरक्षेत्रात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक रज्जाक शेख, अंमलदार राजु बरडे, राजेंद्र पाटील, संदिप सुसर , श्रीकांत तळेगावेकर यांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन रात्री उशीरा गुन्हा दाखल केला.