'Aapli ST' app to soon be at the service of passengers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा एसटी महामंडळाची लालपरी असो की इतर बसचे लोकेशन मिळण्याची सुविधा प्रवाशांना लवकरच उपलब्ध होणार असून, त्यासाठी एसटीने आपली एसटी नावाचे अॅप बनवले आहे. या अॅपद्वारे एसटीचे लोकेशन घरबसल्या कळणार आहे. ही सेवा लवकरच खुली करण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या वतीने देण्यात आली.
एसटी महामंडळ प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी काळानुरूप एसटी बसला अत्याधुनिक केले आहे. याचाच एक भाग म्हणून सर्वच एसटी बसला व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे. याव यंत्रणेमुळे एसटीचे लोकेशन प्रवाशांना घरबसल्या पाहता येणार आहे. यासाठी आवश्यक असलेले अॅपही तयार करण्यात आले असून, आपली एसटी ( MSRTC commuter APP) या नावाने अॅप आहे. हे अॅप तूर्त सर्व अधिकारी-कर्मचारी यांना डाऊनलोड करण्याबाबत ३ ऑक्टोबर रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
अनेक दिवसांपासून केवळ अधिकारी स्तरावर याची चाचपणी सुरू होती. दरम्यान, आता कर्मचाऱ्यांनाही हे अॅप डाऊनलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते प्रवाशांना सुरळीतपणे कसे हाताळता येईल याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर हे अॅप लवकरच सर्वसामांन्य प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.
अनेकदा काही कारणांमुळे बस वेळेवर सोडण्यात येत नाहीत. या यंत्रणेमुळे कोणती बस किती वाजता मार्गस्थ झाली, याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे काही त्रुटी असतील तर त्या दूर करून गाड्या वेळेवर सोडण्याचे नियोजन करण्यात मदत मिळणार आहे.