

20 encroachments at Champa Chowk, Chikalthana, Sevenhill demolished
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात महापालिकेने गुरुवारी (दि.९) चंपा चौक ते दमडी महल, चिकलठाणा, सेव्हनहिल या रस्त्यावर मोहीम राबवत दुकान, हॉटेलसह होर्डिंग अशी २८ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. यात चिकलठाणा येथे अतिक्रमणधारकांनी महापालिकेच्या पथकाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. तर रेल्वेस्टेशन भागात न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे पथकाला कारवाईविनाच माघारी परतावे लागले.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार, नियंत्रण अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन ३ चे सहाय्यक आयुक्त नईम अन्सारी, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, संजय सुरडकर, रवींद्र देसाई, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या पथकाने गुरुवारी चंपाचौक ते दमडी महल या रस्त्यावर असलेली शेड, दुकाने, पक्के बांधकामांवर कारवाई करीत २० अतिक्रमणे जमिनदोस्त केली. या कारवाईसाठी पथक परिसरात धडकताच नागरिकांनी गर्दी केली होती. फौजफाटा पाहून अनेकांनी विरोध करणे टाळले. एका तरुणाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता नागरी मित्र पथकाने त्याची समजूत काढून बाजूला केले.
त्यानंतर कारवाई करण्यात आली. तर दुसरी कारवाई चिकलठाण्यात झाली. येथील ६० मीटर रुंदीच्या रस्त्यावरील अतिक्रमणे यापूर्वीच महापालिकेने जमिनदोस्त केली होती. तरीही या जागेत अनेकांनी जाहीरातीचे फलक लावले होते. हे फलक काढणाऱ्या पथकाला नागरिकांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे थोडावेळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, त्यानंतर कारवाई सुरळीत झाली. तिसरी सेव्हनहिल येथे झोन ७च्या वतीने मोहीम राबविण्यात आली असून येथील दुकानाचे शेड काढण्यात आले.
चंपा चौकातील हॉटेल तुबा, हॉटेल बुशरा, ताज दरबार यासह इतर चार ते पाच हॉटेल चालकांनी रस्ताच ताब्यात घेतला होता. या हॉटेल चालकांना आठ दिवसांपूर्वीच नोटिस बजावून अतिक्रमण काढून घेण्याची सूचना मनपाने केली होती.