A young man was brutally beaten by two policemen until his baton broke
छत्रपती संभाजीनगर पुढारी वृत्तसेवा : मुकुंदवाडी बस स्टॉप परिसरातील एका हॉटेलसमोर सिगारेट घेण्यासाठी थांबलेल्या तरुणाला दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी विनाकारण अमानुषपणे काठी तुटेपर्यंत जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी (दि.२१) मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास घडली. गणेश वाघ आणि संतोष बिरारे अशी मारहाण करणाऱ्या मुकुंदवाडी ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरुद्ध शुक्रवारी (दि.२३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दोघांना तातडीने निलंबित केले आहे.
तक्रारदार अक्षय ज्ञानेश्वर ठोकळ (३२, रा. मुकुंदवाडी) हा त्याचा मित्र भाऊसाहेब मोरे सोबत टीव्ही सेंटर येथे हॉटेलचे लाईट फिटिंगचे काम करून २१ जानेवारी रोजी रात्री १२:३० च्या सुमारास मुकुंदवाडी चौकातील हॉटेल मेवाडसमोर आला. पान टपरीजवळ सिगारेट घेण्यासाठी जाताच तिथे मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी गणेश वाघ आणि संतोष बिरारे तिथे आले. त्यांनी येथे काय करत आहात? अशी विचारणा केली.
तेव्हा त्यांनी आम्हाला सिगारेट घ्यायची असल्याचे सांगितले. तेव्हा पोलिसांनी त्यांना तुमच्याकडील दुचाकी चोरीची आहे. दुचाकीच्या (एमएच-२८-बीएन ८१२६) कागदपत्रांची विचारणा केली. त्यांना अक्षयने बुलढाणा पासिंग असली तरी माझा मित्र खाली पडलेला अक्षय ठोकळ आणि त्याला मारहाण करणारे दोन पोलिस कर्मचारी वाघ आणि बिरारे. जखमी अक्षय ठोकळ मारहाणीचे व्रण शुभम जाधवची दुचाकी असून कागदपत्रे दाखवतो असे म्हंटले. परंतु पोलिस कर्मचारी वाघ आणि बिरारे दोघांनी काहीएक न ऐकून घेता अक्षयच्या कानशिलात लगावली. काठीने बेदम मारहाण सुरू केली. भाऊसाहेब त्यांना मारू नका म्हणत असताना त्याच्या कानशिलात मारताच त्याने घाबरून तेथून धूम ठोकली.
काठीने मारहाण, बुटांनी तुडवले अक्षयला अंमलदार गणेश वाघने काठीने बेदम मारहाण सुरू केली. मारहाणीत अक्षय खाली पडला. तरीही वाघ त्याला काठीने मारहाण करत राहिला. तर अंमलदार बिरारे याने अक्षयच्या छातीत बुटांनी लाथा मारून तुडवले असा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे. या मारहाणीत अक्षय ठोकळ यांस गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या पाठीवर, दंडावर काळंनिळं वर्ण उमटले आहेत. सर्व मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
चौकशीचे आदेश, कडक कारवाई करणार कोणालाही अशी मारहाण करणे योग्य नाही. दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांचे तत्कळ निलंबन केले आहे. तसेच प्राथामिक चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर कायदेशीरपणे कडक कारवाई करण्यात येईल.-प्रवीण पवार, पोलिस आयुक्त