

Life Convict Death Jail Paithan
पैठण : पैठण ते शेवगाव मार्गावरील जिल्हा खुले कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने शुक्रवारी (दि.२३) सकाळी कारागृहाच्या पाठीमागील मोकळ्या जागेतील चिंचाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून जीवन संपविले. शांतीलाल तान्ह्य ओझरे (वय ४४, रा. पालघर) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण येथे नाशिक कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी २०२३ मध्ये बंदी क्रमांक सी. ५५१३ शांतीलाल ओझरे हा बंदी शिक्षा भोगण्यासाठी पैठण येथील जिल्हा खुले कारागृहात येथे वर्ग झालेला होता. नित्यनियमाने कारागृहाच्या शेतीत काम करून आपली सजा भोगत होता. त्याने आज सकाळी कारागृहाच्या भिंतीच्या पाठीमागे असलेल्या चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याचा प्रकार कारागृहातील इतर कैद्यांच्या निदर्शनास आला.
ही घटना पैठण खुले कारागृह अधीक्षक राजेंद्र निमगडे यांना देण्यात आली. तातडीने कारागृहाच्या प्रशासनाने या घटनेची खबर पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांना दिल्यामुळे पैठण पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
नायब तहसीलदार राहुल बनसोडे, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, उपनिरीक्षक संभाजी खाडे, उपनिरीक्षक अजीज शेख यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर शासकीय रुग्णालयात कैद्याच्या कुंटुंबातील सदस्य व न्यायालयाचे न्यायाधीश, महसूल अधिकारी, शासकीय पंच, खुले कारागृहातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पैठण पोलीस पुढील तपास करीत आहे.