A young man drowned in a deep Waghur River
फर्दापूर : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या सात पर्यटक तरुणांपैकी एका तरुणाचा वाघूर नदीपात्रातील खोल डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. ९) दुपारी दोन वाजेच्या सुमारास अजिंठा लेणीच्या डोंगर कुशीत वसलेल्या लेणापूर गावाजवळ घडली. अरबाज अब्दुल गफ्फार शाह (२१, रा. हिनानगर, चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगर) असे तरुणाचे नाव आहे.
चिखलठाणा येथील सात तरुण रविवारी खासगी वाहनाने अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले होते, मात्र फर्दापूर-अजिंठा लेणी टी-पॉइंटमार्गे लेणीकडे जाण्याऐवजी त्यांनी व्ह्यू पॉइंटमार्गे लेणापूर गावातून अजिंठा लेणी परिसरात जाण्याचा निर्णय घेतला.
लेणापूरजवळील वाघूर नदीपात्रातील एका खोल डोहात काही स्थानिक अल्पवयीन मुले पोहत असल्याचे या तरुणांच्या निदर्शनास आले. पोहता येत नसतानाही अरबाज शाह याला डोहात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न घेता थेट डोहात उडी घेतली, मात्र पोहता येत नसल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.