

Chaos during airport ground staff recruitment exam
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : देशात विविध परीक्षांबाबत धक्कादायक खुलासे होत आहेत. नीट पेपरफुटीनंतर महाराष्ट्रात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरात रविवारी (दि. ९) विमानतळावरील ग्राऊंड स्टाफ पदाच्या भरती परीक्षेवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, उशिराने परीक्षा पार पडली असली तरी अनेक उमेदवारांनी परीक्षा देण्यास नकार देऊन पैसे परत करण्याची मागणी केली.
विमानतळावरील ग्राऊंड स्टाफ पदासाठी एनआयए अव्हिएशन सर्व्हिसेस प्रा. लि. कडून या परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षा रविवारी उस्मानपुरा येथील दोन शाळांत घेण्यात येत होत्या. विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावल्यानंतर संबंधित कंपनीचे अधिकारी कर्मचारी नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चौकशी केली. मात्र समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवश्यक डीजीसीएची परवानगी आणि अधिकृत कागदपत्रे दाखवण्यात आली नसल्याचा आरोप आहे. परीक्षेच्या नोटिफिकेशनवर आयबीपीएसचं नाव असल्याने विद्यार्थ्यांनी आयबीपीएसच्या नावाच्या गैरवापराबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ६०० रुपये भरल्याचे सांगितले असून, केंद्रावर सीट नंबर, चेकिंग कर्मचारी आणि आवश्यक व्यवस्था नसल्याचाही आरोप आहे.
परीक्षेसाठी थर्ड पार्टी :
परीक्षा ऑनलाईन असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र परीक्षा केंद्रावर एकही संगणक नव्हते. विशेष म्हणजे ही परीक्षा घेण्याची जबाबदारी सी-२ एक्सप्लोरर कंपनीला दिल्याची माहिती समोर आली. ही परीक्षा थर्ड पार्टी म्हणून घेत असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. परीक्षा सकाळी १२.३० वाजता आयोजीत केली होती, परंतु गोंधळामुळे ही परीक्षा दुपारी घेण्यात आली. परीक्षा रद्द करणे किंवा पैसे परत करणे आपल्या अधिकारात नसल्याचेही आयोजकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या गोंधळानंतर पोलिस केंद्रावर दाखल झाले होते. दरम्यान ४०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, केवळ १५ ते २० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नसल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. तर विमानतळ प्रशासनांकडून अशा प्रकारची अधिकृत परीक्षा घेतली नसल्याचे सांगण्यात आले.
पैसे परत करण्याची मागणी
अनेक विद्यार्थ्यांनी सीट नंबर दिला नाही, चेकिंग साठी स्टाफ दिला नाही, बाहेर बोर्डसुद्धा लावला नाही. पाचशे मीटरच्या अंतरावर २ सेंटर ठेवले, असा आरोप करत परीक्षा दिली नाही. त्यांनी पैस परत करण्याची मागणी संबंधित कंपनीकडे केली आहे.