A Study Hall Becomes a Beacon of Knowledge for Nomadic Students
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आर्थिक अडचणी आणि स्थलांतरित जीवनशैलीमुळे शिक्षणापासून दूर जाणाऱ्या भटक्या व गरजू विद्यार्थ्यांसाठी बीड बायपास परिसरातील मल्हार सेवा वस्तीत सुरू करण्यात आलेली पालावरची अभ्यासिका आशेचा किरण ठरत असून, या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा मिळत आहे.
भटक्या व गरजू विद्यार्थ्यांसाठी बीड बायपास परिसरातील मल्हार सेवा वस्तीत अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासिकेत दररोज सुमारे ५० ते ६० विद्यार्थी नियमितपणे शिक्षण घेत आहेत. यात बहुतांश विद्यार्थी बाहेरील राज्यांतून रोजगारासाठी आलेल्या कुटुंबांतील आहेत. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची जिद्द या विद्यार्थ्यांनी कायम ठेवली असून, या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
दरम्यान, या अभ्यासिकेची माहिती मिळल्यानंतर मनपा स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी नुकतीच या अभ्यासिकेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत शिक्षणासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून अभ्यासिकेत खिचडी आणि गोड पदार्थ सुरू करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत पोषणयुक्त आहाराचाही लाभ मिळणार आहे.
समाजातील वंचित, भटके आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम परिसरात प्रेरणादायी ठरत असून, स्थानिक नागरिकांकडून त्याचे स्वागत केले जात आहे.