Sambhajinagar News : सिद्धार्थ उद्यान जलतरण तलावावर खर्चाचा वर्षाव file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : सिद्धार्थ उद्यान जलतरण तलावावर खर्चाचा वर्षाव

कोट्यवधींच्या दुरुस्तीनंतरही समस्या कायम : नव्या कामांसाठी पुन्हा लाखोंची मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

A Shower of Spending on the Siddharth Garden Swimming Pool

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील जलतरण तलावाच्या दुरुस्तीवर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांत विविध कामांसाठी लाखो रुपये खर्च करूनही तलावातील तांत्रिक आणि संरचनात्मक अडचणी पूर्णपणे दूर न झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सुमारे तीन ते साडेतीन दशकांपूर्वी उभारण्यात आलेल्या सिद्धार्थ उद्यानातील जलतरण तलावाची रचना आता जुनी झाली आहे. त्यामुळे देखभाल आणि दुरुस्तीचा बोजा सातत्याने वाढत आहे. काही वर्षांपूर्वी गळती रोखणे, बांधकाम दुरुस्ती आणि रंगकामासाठी जवळपास ७० लाख रुपये खर्च करण्यात आले होते.

त्या दुरुस्तीनंतर तलाव पुन्हा सुरू करण्यात आला. मात्र त्यानंतरही अनेक समस्या अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः प्रेक्षक गॅलरी, बॅलेन्सिग टैंक आणि इतर काही भागांतील अपूर्ण कामांमुळे पुन्हा दुरुस्तीची आवश्यकता निर्माण झाली आहे. सध्या गॅलरीवरील शेडसाठी नवीन पर्लिन्स बसविणे, बॅलेन्सिग टँकची दुरुस्ती व संपूर्ण रंगरंगोटी अशी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २०२२-२३ च्या दरसूचीनुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते.

या कामासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत पाच ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर सिद्दीकी जलीसोद्दीन यांना ३८ लाख ३५ हजार १८५ रुपयांचे काम २६.२५ टक्के कमी दराने देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष दुरुस्तीला लवकरच सुरुवात होणार आहे.

नागरिकांमध्ये नाराजी...

पाणीटंचाईमुळे एप्रिल २०१९ मध्ये हा तलाव बंद करण्यात आला होता. त्यानंतर गळती आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली. मात्र, सतत निधी खर्च होऊनही समस्या कायम राहत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

जलतरण तलावाच्या देखभालीसाठी सातत्याने निधी खर्च होत असताना समस्या मात्र कायम राहत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कामांच्या गुणवत्तेबाबत तसेच प्रशासनाच्या नियोजनक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सार्वजनिक निधीचा योग्य आणि परिणामकारक वापर होत आहे का, याबाबतही नागरिकांत चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT