

Chikhali-Shringeridevi Road in Poor Condition
पाटोदा, पुढारी वृत्तसेवा पाटोदा तालुक्यातील चिखली ते शृंगेरीदेवी (ग्रामीण मार्ग क्र. १०५) या रस्त्याच्या कामावर ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप घेतला असून काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा १३ एप्रिलपासून उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा रस्ता मंजूर झाल्यानंतर काम सुरू झाले असले, तरी प्रत्यक्षात कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याचे रुंदीकरण ३३ फूट मंजूर असताना प्रत्यक्षात सिमेंट रस्ता केवळ ९ फूट करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंना मोठे खड्डे करून त्यातीलच माती भरावासाठी वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे याशिवाय रस्त्याच्या कडेला 'पंखे' (साईड शोल्डर) न भरल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
सिमेंट रस्त्याला आवश्यक प्रमाणात पाणी न दिल्याने सुरुवातीपासूनच खडी व सिमेंट उखडू लागल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्त्याच्या टिकाऊपणाबाबत शंका निर्माण झाली आहे. याशिवाय, २२ फूटांत सिमेंट रस्ता, पंखे व नालीचे काम अपेक्षित असताना ३३ फूट खोदकाम का करण्यात आले, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला असून साहेबराव सुरवसे, दादा लाड यांच्या शेताजवळ तसेच नवनाथ लाड यांच्या घर-ाजवळ आणि चिखली गावालगत नदी-तलाव प्रवाह असलेल्या ठिकाणी पूल बांधण्यात आ लेले नाहीत.
दर २०० फुटांवर पाण्याच्या निचऱ्यासाठी आवश्यक सिमेंट पाइप टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात रस्ता वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील अनेक प्रमुख व ग्रामीण रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून दरवर्षी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद केली जाते; मात्र प्रत्यक्षात कामाच्या गुणवत्तेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
अनेक ठिकाणी निधी वेळेत उपलब्ध होत नाही, तर काही ठिकाणी कामे 'थातुरमातुर' पद्धतीने करून पूर्ण दाखवली जात असल्याचे आरोप होत आहेत. अधिकारी, कंत्राटदार व काही लोकप्रतिनिधी यांच्या संगनमतातून निधीची विल्हेवाट लावली जात असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे. याचा थेट परिणाम म्हणजे रस्ते काही महिन्यांतच खराब होणे, अपघातांची संख्या वाढणे आणि नागरिकांना होणारा त्रास.
काम करा दर्जेदार, अन्यथा उपोषण'
या सर्व प्रकाराची चौकशी करून दर्जेदार काम करून घ्यावे, अन्यथा १३ एप्रिलपासून उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर रोहिदास येवले, सारिका येवले, यश येवले, श्रेया येवले, बापू शिंदे, निवृत्ती येवले, गहिनीनाथ येवले, वैजीनाथ लाड, रामदास सुरवसे, अशोक राऊत, सागर शिंदे आदींसह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
नागरिकांचा सवाल : जबाबदार कोण?
रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च होत असतानाही दर्जेदार कामे का होत नाहीत? निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई का होत नाही? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. चिखली-शृंगेरीदेवी रस्त्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील रस्त्यांच्या दर्जाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.