A shop in Connaught Place was broken into and clothes worth 5 lakhs were stolen
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कॅनॉट भागातील दुकानाचे शटर उचकटून चोरटयांनी साड्या, लेडीज वेअर आणि रोख रकमेसह ५ लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी (दि.१५) मध्यरात्री सिडको एन ५, बंबई स्टेशनरी जवळ, पूजन रेडिमेड शॉप नावाच्या दुकानात घडली.
फिर्यादी जयश्री संदीप गुजराथी (४२, रा. जाफरगेट, निवारा अपार्टमेंट) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे कॅनॉट प्लेस येथे पूजन रेडिमेड नावाचे दुकान आहे. गुरुवारी रात्री १० वाजता त्या दुकान बंद करून घरी गेल्या. मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला.
दुकानातून दीड लाखाच्या साड्या, ५० हजारांचे फॉल, अस्तर, ९० हजाराचे बनियान व अन्य, एक लाखाचे लेडीज वेअर, १० हजाराची रोकड असा ५ लाखाचा ऐवज लंपास केला. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बाजूच्या दुकानदाराने त्यांना कॉल करून तुमच्या दुकानात चोरी झाल्याचे सांगितले.
गुजराथी यांनी तत्कळ दुकानाकडे धाव घेतली. चोरीला काय गेले याची पूर्ण तपासणी केल्यानंतर त्यांनी मंगळवारी (दि.२०) सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पवार करत आहेत.