

Rural police arrested two individuals with two country-made pistols and live cartridges
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण पोलिस दलाच्या दहशतवाद विरोधी शाखेने दोन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसांसह दोघांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई जालना रोडवरील झाल्टा फाटा येथे सोमवारी (दि. १९) करण्यात आली. बाबासाहेब रामराव ऊर्फ रामभाऊ मिसाळ (३०, रा. जानेफळ दाभाडी, ता. भोकरदन) आणि रईस खान अजीम खान पठाण (रा. हुसेन कॉलनी, पुंडलिकनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
अधिक माहितीनुसार सोमवारी दहशतवाद विरोधी शाखेचे पथक गस्तीवर असताना सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती दुचाकीवरून गावठी कट्टा (पिस्तूल) विक्रीसाठी छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडने जात आहे. या माहितीच्या आधारे जालना रोडवरील पोतदार इंटरनॅशनल स्कूलजवळील सिगनिचर-४१ समोर सापळा लावला.
दुचाकीवरून येत असताना पोलिसांनी शिताफीने बाबासाहेब मिसाळला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस सापडले. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिनकर गोरे, उपनिरीक्षक मनोहर खंडागळे, अंमलदार विक्रम देशमुख, श्रीमंत भालेराव, संजय घुगे, राजेंद्र डकले, वाल्मीक निकम व गणेश कोरडे यांच्या पथकाने केली.
मध्यप्रदेशातून शस्त्रांची तस्करी
पिस्तूल पुरवठा करणारा बाबासाहेब मिसाळ हा सराईत गुन्हेगार आहे. तो मध्यप्रदेशातून गावठी कट्टा आणून विक्री करतो. त्याला दोन वर्षांपूर्वी धुळे, शिरपूर येथे पाच पिस्तुलांसह दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. जेलमधून बाहेर पडल्यानंतरही त्याने गावठी कट्टा विक्रीचा गोरखधंदा सुरूच ठेवल्याचे या कारवाईवरून समोर आले.
रईसने ३० हजारांत घेतला कट्टा
बाबासाहेब मिसाळला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने एक कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे रईस खान याला विक्री केल्याची कबुली दिली. पोलिसांनी लागलीच झाल्टा फाटा येथील गुरुसाया डोसा सेंटरज-वळून रईस खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडूनही एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. मिसाळकडून त्याने ३० हजारांमध्ये गावठी कट्टा खरेदी केल्याचे चौकशीत समोर आले.